Tue, Jun 18, 2019 20:23होमपेज › Ahamadnagar › काँग्रेसला हवंय विखे-थोरातांचं ‘टॉनिक’..!

काँग्रेसला हवंय विखे-थोरातांचं ‘टॉनिक’..!

Published On: Aug 06 2018 1:51AM | Last Updated: Aug 06 2018 12:13AMगाेरख शिंदे

एकेकाळी राज्याचं नेतृत्व कुणी करावं, हे सांगण्याचा दबदबा जिल्ह्यातील तत्कालीन काँग्रेसी नेतृत्वानं निर्माण केलेला होता. मात्र, नंतरच्या काळात कायमच गटबाजीच्या राजकारणात अडकल्यानं काँगे्रसची अवस्था जिल्ह्यात मरणासन्नतेकडे झुकू लागलीय. अनेक वर्षे जिल्ह्यात ‘सुवर्णकाळ’ अनुभवणारी काँगे्रस मात्र आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे अन् नुकतेच काँगे्रसच्या राष्ट्रीय कार्यकारी मंडळावर सदस्य म्हणून नियुक्‍त झालेले आ. बाळासाहेब थोरात या नेत्यांच्या राजकीय संघर्षात पुरती खिळखिळी झालीय. अन् ही तक्रार दुसरी-तिसरी कोणाची नसून, या पक्षाच्या पदाधिकार्‍यांचीच आहे.

राज्याचं नेतृत्व करण्याची ‘क्षमता’ असलेल्या या दोन्ही नेत्यांमधील हा सुप्त संघर्ष जिल्ह्यातील पक्षाचे अन्य नेते, पदाधिकारी अन् कार्यकर्ते अनेक वर्षांपासून अनुभवतायेत. त्यामुळं राजकीय धुसमटीशिवाय त्यांच्या पदरात फारसं काही पडताना दिसत नाहीये. त्यामुळे ते अक्षरश: हवालदील झालेयेत. जिल्ह्यात पक्षाची होत असलेली ही दारूण अवस्था पाहून आता ज्येष्ठ पदाधिकार्‍यांनीच कार्यकर्त्यांची ही खदखद थेट पक्षाच्या निरीक्षकांसमोरच मांडण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय. या दोन्ही नेत्यांना एकत्र आणून, त्यांनी एकत्र बसून सहमतीने निर्णय घेतल्यास पक्षाला जिल्ह्यात पुन्हा सुगीचे दिवस येतील, त्यासाठी ‘विखे-थोरात’ यांच्या सहमतीचं ‘टॉनिक’ पक्षाला हवंय, अशी ‘भाबडी’ आशा त्यांना वाटतेय.

आता जिथं संघटनाच मजबूत नाही, तिथं काँगे्रसला भाजपासारखे ‘अच्छे दिन’ कसे येणार? या दोन्ही नेत्यांमध्ये जिल्ह्यातील संघटनेबाबत एकमत नसल्यानं पक्षाला पुरती मरगळ आलीय. तालुकाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी यांच्या नियुक्त्याच झालेल्या नसल्यानं जिल्ह्यात संघटनात्मक कामांत शिथिलता आलीय. पक्षाचे उपक्रम राबविताना अडचणी येत असल्याची व्यथाही शिष्टमंडळानं निरीक्षकांच्या समोर मांडली. पक्षसंघटना पुन्हा बळकट करायची असेल तर पक्षश्रेष्ठींनी या दोन्ही नेत्यांना एकत्र बसून, सहमतीने निर्णय घ्यावयास लावावेत, असे साकडेच घालण्यात आलेय. जिल्ह्यातील ही परिस्थिती नेहमीप्रमाणं ऐकून घेत, त्याचा अहवाल पक्षाध्यक्ष, पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी अन् प्रदेशाध्यक्षांना पाठविला जाईल, अन् तेच यावर निर्णय घेऊन हा प्रश्‍न निकाली काढतील, असा चेंडू वरिष्ठांकडं टोलवित पक्ष निरीक्षकांनीही शिष्टमंडळाची बोळवण करण्यातच धन्यता मानली. आता हा नेत्यांतील वाद थेट पक्षाध्यक्ष राहुल गांधींच्या कोर्टात गेला असलातरी, त्यांच्याकडून यावर निर्णय होऊन जिल्ह्यात ‘विखे-थोरात’ यांची सहमती एक्स्प्रेेस धावणार का, असा प्रश्‍न काँगे्रसच्या कार्यकर्त्यांसमोर आहे.

एकेकाळी संपूर्ण जिल्ह्यावर अधिराज्य गाजविणारी काँगे्रस आता बॅकफूटवर गेली आहे. अर्थात काँगे्रसमध्ये फूट पडून उदयास आलेल्या राष्ट्रवादी काँगे्रसमुळंही या पक्षाला चांगलाच फटका बसला. जिल्ह्यात असलेल्या बारापैकी अवघ्या तीनच विधानसभा मतदारसंघात काँगे्रसचे आमदार आहेत. त्यातही शिर्डीत स्वत: विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे अन् संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात. तर तिसरे आ.भाऊसाहेब कांबळे श्रीरामपुरात. तिघेही जिल्ह्याच्या उत्तर भागात. दक्षिणेत एकही आमदार नाही. त्यातही जिल्हा परिषद अध्यक्षपद काँगे्रसकडं असलं तरी ते राष्ट्रवादी काँगे्रसबरोबरच्या आघाडीमुळं अन् तेही शालिनीताईंच्या रूपानं विखे यांच्याच घरातच. मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पाच जागा मिळवत भाजपानं आघाडी मारली. देशात अन् राज्यात भाजपाची सत्ता आल्यानं अनेक वर्षे सत्तेची फळं चाखणारे काँगे्रसचे कार्यकर्ते सैरभैर झालेत.

निवडणुकीशिवाय पक्षाचं अस्तित्व दिसेनासं झालंय. महागाईविरोधात मागे नगरमध्ये पुकारण्यात आलेल्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्याशिवाय कोणीही बडा नेता उपस्थित राहिला नाही. फक्‍त शहरातील मंडळीच तेवढी हजर..इथंही काँगे्रसची गटबाजी..प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष थोरात गटाकडे..त्यामुळं विखे गटाचा कोणी कार्यकर्ताही त्याकडं फिरकला नाही. पक्षाकडं उरलेत ठराविकच कार्यकर्ते, अशी एकंदर अवस्था. मागील विधानसभा निवडणुकीत नगर शहरात काँगे्रसकडून आ. थोरात यांचे भाचे अन् प्रदेश युवक काँगे्रसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी निवडणूक लढविली. मात्र, गटबाजीच्या राजकारणामुळं ते थेट चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. पक्षाला अनेक वर्षांपासून स्वतंत्र शहर जिल्हाध्यक्षच नाही. ब्रिजलाल सारडा यांनी या पदाचा राजीनामा दिल्यापासून नगरसेवक दीप चव्हाण प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून ‘पद’ सांभाळतायेत.

नगर तालुक्यात दादा पाटील शेळके, संपतराव म्हस्के, बाळासाहेब हराळ अशा मोजक्याच नेत्यांवर पक्षाची धुरा. पण तालुक्याच्या राजकारणात त्यांचीही शिवसेनेशी आघाडी. त्यामुळं पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व काही दिसेना. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतही अशीच एकंदरीत परिस्थिती. पक्षाचे तालुकाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी यांच्या नियुक्त्या रखडल्यानं संघटनात्मक पातळीवर पुरती मरगळ आलेली आहे. त्यामुळं अनेकांनी पक्षातील गटबाजीला कंटाळून अन्य पक्षांचा रस्ता धरणं पसंत केलंय. एकीकडं आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं देशात भाजपाविरोधात सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नेतृत्वाकडून सुरू आहे.

तर दुसरीकडं नगर जिल्ह्यात पक्षाची संघटनाच अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांना पडतोय. कार्यकर्त्यांमधील ही खदखद पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, प्रदेश युवक काँगे्रसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे, जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष केशवराव मुर्तडक आदींच्या शिष्टमंडळाने नाशिक येथे पाच जिल्ह्यांसाठी निरीक्षक म्हणून आलेले अखिल भारतीय काँगे्रस कमिटीचे सचिव आशिष दुवा व सोनल पटेल यांच्यासमोर मांडली खरी. पण, शिष्टमंडळाला त्यांच्या आश्‍वासनावरच आपली भूक भागवावी लागली. अर्थात दरवेळी निवडणुका जवळ आल्या की, काँगे्रसमधील विखे-थोरात गटाला एकत्र आणण्याची चर्चा नेहमीप्रमाणं सुरू होते. आताही तोच प्रयत्न होत असल्याचं दिसतंय. मात्र, अनेक वर्षांचा अनुभव पाहता तसं काही घडताना काही दिसत नाही. त्यामुळं आताचा प्रयत्नही तसाच ठरण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.

काँगे्रसचे तत्कालीन शहर जिल्हाध्यक्ष असलेल्या भानुदास कोतकर यांनी शहरासह नगर तालुक्यातही पक्षाचं चांगलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. अपेक्षित संख्याबळ नसताना शिवसेनेतील फुटीचा लाभ उठवत राष्ट्रवादी आणि अपक्षांच्या मदतीनं काँगे्रसचा महापौर करून दाखविण्याची किमया त्यांनी करून दाखविली होती. त्यावेळी केडगाव तर काँगे्रसचा बालेकिल्लाच होता. नंतर काही प्रमाणात तो ढासळला तरी, काँगे्रसचे अस्तित्व कायम होते. त्यातून नंतर सुवर्णा कोतकर यांच्या रूपानं काँगे्रसला उपमहापौरपदाची संधीही मिळाली. मात्र, नंतर कोतकर पिता-पुत्र लांडे खूनप्रकरणात दोषी ठरले अन् त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.

कोतकर यांचं शहरजिल्हाध्यक्ष पदही गेलं. त्यामुळं केडगावात सुवर्णा कोतकर यांच्यावरच पक्षाची धुरा आली होती. संदीप कोतकरचं पद गेल्याने रिक्‍त झालेल्या केडगाव येथील जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँगे्रसला विजय मिळाल्यानं पक्षाचं अस्तित्व कायम टिकून होतं. पण, या निवडणुकीच्या निकालानंतर घडलेल्या शिवसैनिकांच्या हत्याकांडामुळं काँगे्रस पक्ष पुरता अडचणीत आला. निवडून आलेला विशाल कोतकर आणि सुवर्णा कोतकरही या प्रकरणात अडकले आहेत. त्यामुळं तीनचार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत काँगे्रसला केडगावमध्ये याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. केडगावमध्ये काँगे्रसची धुरा आता कोण सांभाळणार, असा प्रश्‍न पक्षापुढं असणार आहे. मागील मनपा निवडणुकीत काँगे्रसला 11 जागा मिळाल्या होत्या. त्यात एकट्या केडगावमधील 6 जागा होत्या. तर शहरातील पाच जागांवरील नगरसेवक हे पक्षापेक्षा स्वत:च्या जीवावर तसेच राष्ट्रवादीशी आघाडीमुळे निवडून आले.

नंतर सत्तेच्या राजकारणात यातील तीनजण काँगे्रसपासून दुरावले. त्यामुळं आगामी महापालिका निवडणुकीत काँगे्रसची फार मोठी कसरत होणार आहे. राष्ट्रवादीशी आघाडी झाली तरी, शहरात नेतृत्वच नसल्यानं काँगे्रसच्या पदरात जागावाटपात फारसं काही पडण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळं काँगे्रसच्या अनेकांनी पूर्वीपासूनच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाशी जुळवून घेतलंय. असं असताना महापालिका निवडणुकीत विखे-थोरात यांच्या पसंतीने उमेदवार दिल्यास आणि त्यांच्या विजयाची जबाबदारी या दोन्ही नेत्यांवर सोपविल्यास काँगे्रसला चांगले यश मिळण्याचा दावा पदाधिकार्‍यांनी निरीक्षकांसमोर केला खरा. मात्र, स्थानिक पातळीवर पक्षाला नेताच नसल्यानं हा दावा कसा खरा ठरणार, असा प्रश्‍न आहे.

त्यातही मागील महापौर निवडणुकीत शिवसेनेविरोधात भाजपाच्या एका गटाने उमेदवार उभा केल्यानंतर मतदान करायचे की, तटस्थ राहायचे याबाबत काँग्रेसच्या विखे गटाची भूमिका तळ्यात-मळ्यात होती. दस्तुरखुद विरोधी पक्षनेते विखे यांनी याबाबतचा निर्णय गटनेत्या सुवर्णा कोतकर घेतील, असे सांगत पत्ते उघड केले नव्हते. मात्र, निवडणुकीच्या वेळी मनपा सभागृहात पक्षाचा हागट भाजपाच्या उमेदवाराच्या बाजूने उपस्थित होता. अर्थात शिवसेना-भाजपात अखेरच्या क्षणी तडजोड होऊन मतदान न झाल्यानं काँगे्रसच्या या गटाची खरी भूमिका उघड होऊ शकली नाही. तर दुसर्‍या गटाचे तिघे अगोदरच शिवसेनेच्या गोटात गेलेले होते. त्यामुळं आगामी महापालिका निवडणुकीत पक्ष निरीक्षकांकडं गेलेल्या शिष्टमंडळातील ‘त्या’ पदाधिकार्‍यांच्या अपेक्षेप्रमाणे ‘विखे-थोरात’ यांच्या सहमती एक्स्प्रेसचं ‘टॉनिक’ मिळालं तरी, काँगे्रसला अपेक्षित यश मिळण्याची शक्यता धूसरच असल्याचं बोललं जातंय. असो, कारण घोडा मैदान आता जवळच आहे..!