Fri, Apr 26, 2019 15:19होमपेज › Ahamadnagar › लोकसभेची जागा काँग्रेसला हवी

लोकसभेची जागा काँग्रेसला हवी

Published On: Jun 16 2018 1:28AM | Last Updated: Jun 16 2018 12:00AMपाथर्डी ः शहर प्रतिनिधी 

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडून येण्याची क्षमता डॉ. सुजय विखे यांचेकडे असून,राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा बदलून काँग्रेसला द्यावी, यासाठी जिल्हा काँग्रेसचे शिष्टमंडळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना भेटणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी दिली.

पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न होऊन शेलार यांनी कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून घेतले .आगामी लोकसभा -विधानसभा निवडणूक डोळयासमोर काँग्रेस पक्षाने संघटना बांधणी व संपर्क अभियान हाती घेतले आहे.बैठकीनंतर पत्रकारांशी शेलार यांनी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, ज्येष्ठ नेते संभाजी वाघ,अ‍ॅड. प्रतीक खेडकर, नासिर शेख,पृथ्वीराज आठरे, किशोर डांगे, प्रकाश शेलार, बाळासाहेब शिरसाठ,अलिम पठाण, पोपट बडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

शेलार म्हणाले, भाजपाच्या चार वर्षाच्या केंद्र व राज्य सरकारच्या गलथान, विश्‍वासघातकी कारभारामुळे काँग्रेसला आगामी काळात अच्छे दिन येणार आहेत. भाजपाच्या राजवटीत जनतेच्या एक दिवस सुध्दा चांगला गेला नाही.जनता फक्त निवडणुकीची वाट पहात आहे.एकत्र निवडणुका झाल्यास काँग्रेसला सर्वत्र बहुमत मिळेल. केंद्रात व राज्यात सरकार भाजप विरोधी विचाराचे सरकार आणायचे असेल तर निवडून  येण्याची क्षमता पाहून जागांची अदला बदल करण्याची मानसिकता ठेवली पाहिजे.

जिल्ह्यात अनेक मातब्बर मंडळी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असून लवकरच ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जिल्हा पातळीवर महामेळावा आयोजित करून ताकद दाखवून देऊ. नगर लोकसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावा यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचे शेलार यांनी सांगितले.