Wed, Mar 27, 2019 06:00होमपेज › Ahamadnagar › ‘उपमहापौर’साठी काँग्रेस सरसावली!

‘उपमहापौर’साठी काँग्रेस सरसावली!

Published On: Mar 04 2018 1:46AM | Last Updated: Mar 04 2018 12:47AMनगर : प्रतिनिधी

नको-नकोसे झालेल्या उपमहापौर पदासाठी भाजपाने माघार घेतल्यानंतर या पदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. सत्ताधारी शिवसेनेची बहुमतासाठी दमछाक झाली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने या निवडणुकीसाठी अंतर्गत वाद बाजूला ठेवून एकत्र येत ‘राष्ट्रवादी’ची मदत मिळविण्यासाठी प्रदेशाध्यक्षांना साकडे घातले आहे. दुसरीकडे ‘मनसे’ मात्र ‘राष्ट्रवादी’कडे पाठिंब्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या बंडखोर गटावरच शिवसेनेची मदार असल्याचे चित्र आहे.

श्रीपाद छिंदमच्या वक्तव्याचे प्रायश्‍चित्त म्हणून उपमहापौर निवडणुकीत भाजपाने माघार घेत आगरकर गटाचे स्वप्न धुळीस मिळविले. तर मतदानात सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय राखून ठेवत शिवसेनेचीही कोंडी केली आहे. त्यातच बंडखोर गटानेही आता उपमहापौर पदासाठी ‘खडू’ केला आहे. समद खान व मुदस्सर शेख या दोघांपैकी एकाला उमेदवारी देवून शिवसेनेने समर्थन द्यावे, असा प्रस्ताव शिवसेनेला देण्यात आल्याचे विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी स्पष्ट केले आहे. शुक्रवारी (दि.2) त्यांची शिवसेना पदाधिकार्‍यांबरोबर बैठकही झाली. काल (दि.3) सायंकाळीही शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी बंडखोर गटाच्या सदस्यांशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांनी अद्याप कुठलाही निर्णय जाहीर केलेला नाही. तसेच स्वपक्षातील नाराज दीपाली बारस्कर, सागर बोरुडे व सारिका भुतकर यांची नाराजी दूर करण्याचे आव्हानही शिवसेनेसमोर आहे. त्यांना स्थायी समिती सदस्यत्वाचा शब्द देऊन त्यांची नाराजी दूर केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर अपक्ष नगरसेविका उषा ठाणगे याही नाराज गटात सामील झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

दुसरीकडे मुदस्सर शेख यांच्या उमेदवारी अर्जामुळे काँग्रेसच्या आशा मात्र पल्लवित झाल्या आहेत. माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी उपमहापौर निवडणुकीसंदर्भात काल सकाळी नगरसेवकांची बैठकही घेतली. यावेळी सुनीला कोतकर, मुदस्सर शेख, सुनीता कांबळे, सविता कराळे, रुपाली वारे आदी उपस्थित होते. नगरसेवकांची मते घेवून याबाबत अहवाल कोतकर यांनी ‘प्रदेश’कडे पाठविला आहे. तर दुसरीकडे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनीही शेख यांच्या उमेदवारीबाबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे अहवाल सादर केला आहे. मनपात ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ची आघाडी आहे. राष्ट्रवादीकडे महापौर पद होते. तर काँग्रेसकडे उपमहापौर पद होते. या निवडणुकीत काँग्रेसला राष्ट्रवादीचा पाठिंवा मिळावा, यासाठी वरीष्ठ पातळीवर ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांशी चर्चा करावी, अशी मागणी चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे. ‘प्रदेश’कडून आलेल्या निर्णयानुरच पुढील निर्णय होईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे तीन सदस्य असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही उपमहापौर पद हवेहवेसे झाले आहे. महापौर निवडणुकीवेळी राष्ट्रवादी, शिवसेनेला मनसेने वेळोवे मदत केल्याची आठवण करुन देत यावेळी आम्हाला पाठिंवा द्यावा, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. शिवसेनेकडून या मागणीचा विचार होणार नसल्याने सध्यातरी मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. 

एकूणच सुरुवातीला सोपी वाटणारी उपमहापौर निवडणूक ऐनवेळी रंगात आली आहे. बंडखोर गटाकडून झालेली उमेदवारी व त्यांना ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ची साथ मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे व भाजपाच्या खा. दिलीप गांधी गटाकडून अद्यापही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नसल्याने शिवसेना पदाधिकार्‍यांची मनधरणीसाठी धावपळ सुरु आहे. तर मनसेने मारलेली कोलांटी उडी शिवसेनेची डोकेदुखी ठरलेली आहे. मात्र, रात्री उशिरा झालेल्या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा बंडखोर गट तसेच शिवसेनेच्या दीपाली बारस्कर यांची नाराजी दूर करून सकारात्मक तोडगा काढण्यात शिवसेना पदाधिकार्‍यांना यश आल्याचे सांगण्यात आले.