नगर : केदार भोपे
लोकसभा निवडणूक वर्षावर आलेली असतांना काँग्रेस पक्षांतर्गत मात्र गोंधळाचे वातावरण आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीने जिल्ह्यात पूर्वतयारी सुरु केली असतांना काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणुकाच वर्षभरापासून रखडल्या आहेत. सात महिन्यांपूर्वी पक्षनिरीक्षकांनी दिलेला अहवाल प्रदेश काँग्रेसकडून अडगळीत टाकल्याने निवडीला मुहूर्त मिळालेला नाही.
जिल्ह्यात काँग्रेसला नवी उभारी देण्यासाठी पक्षांतर्गत निवडणुका घेण्यात येणार होत्या. त्यानुसार पक्षनिरीक्षकांनी मागच्या जून महिन्यात आढावा घेतला होता. पक्षाकडून कुठलाही कार्यक्रम नसल्याने जिल्ह्यातील कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. त्यातच जिल्हाध्यक्ष असलेल्या जयंत ससाणे यांचे निधन झाल्याने जिल्हाध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचा पक्षांतर्गत निवडणुकांचा कार्यक्रम संपल्यावर काँग्रेसच्या निवडी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात काँग्रेस पक्षात झालेली मरगळ दूर करण्यासाठी शहर व ग्रामीण असे दोन्ही जिल्हाध्यक्ष बदलण्यात येणार आहेत. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार होती. पक्षनिरीक्षक व बिहार महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आ. अमिता भूषण यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला होता. त्याचा अहवाल प्रदेश कमिटीला पाठविण्यात आला. त्यानंतर पंधरा दिवसांच्या आत मतदारयादी जाहीर करून निवडणुका घेण्यात येणार असल्याचे आ. भूषण यांनी जाहीर केले होते. मात्र पाच महिने उलटले तरी निवडणुकीची कुठलीही हालचाल दिसून येत नसल्याने, काँग्रेसअंतर्गत अस्थैर्याचे वातावरण झाल्याचे दिसते.
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत काँग्रेसमधील दोन गटात ‘क्रॉस व्होटिंग’ झाल्याने काँग्रेसला दोन जागांवर फटका बसला. विखेंकडून भाजपात जाण्याचे संकेत मिळत असल्याने थोरात गटही सावध झाला आहे. त्यामुळे पक्षांतर्गत निवडणुकांमध्ये विखे गटाचे वर्चस्व झाल्यास आणि त्यानंतर विखे भाजपसोबत गेल्यास पक्षांतर्गत कार्यकारिणीला धोका पोहचू शकतो. या कारणावरूनच थोरात गटाने पक्षांतर्गत निवडणुका उशिरा घेण्याची शिफारस प्रदेश पातळीवर केल्याचे कळते.
आ. अमिता भूषण यांनी पक्षांतर्गत निवडणुकीच्या अनुषंगाने करायच्या कार्यवाहीबाबत कार्यकर्ते, पदाधिकार्यांना त्यांनी सूचना दिल्या होत्या. नगर ग्रामीण जिल्ह्याचा आढावा घेतला होता. त्यावेळी अनेक कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी निवडणुकीत वंचित, दलित व अल्पसंख्यांकांना प्रतिनिधित्व मिळत नसल्याचे सांगत, अंतर्गत वादाने जिल्ह्यात पक्षाचे नुकसान झाल्याचे सांगितले. त्यामुळे वंचित, दलित, अल्पसंख्यांक व बहुसंख्यांक असेही गट पडल्याचे दिसून येते.
त्यावेळीच पक्षांतर्गत निवडणुकीसाठी मतदार यादी प्रदेश कार्यालयाला पाठविण्यात आली होती. 5 ऑगस्टपर्यंत अंतिम मतदार यादी होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे सांगण्यातआले. सुरुवातीस बूथ अध्यक्ष निवडण्यात येईल. त्यानंतर ब्लॉक कमिटीसाठी निवडणूक होईल. प्रत्येक ब्लॉकसाठी निवडणूक अधिकारी म्हणून तालुका निरीक्षकांची नेमणूक करण्यात येईल. बूथ अध्यक्ष व ब्लॉक कमिटीची निवडणूक झाल्यावर नगर शहर जिल्हाध्यक्ष व ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात येणार होती.