Wed, Mar 27, 2019 01:59होमपेज › Ahamadnagar › ‘त्या’ अहवालावरून विधानसभेत गोंधळ

‘त्या’ अहवालावरून विधानसभेत गोंधळ

Published On: Jul 20 2018 1:10AM | Last Updated: Jul 19 2018 10:41PMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडाबाबत विधानपरिषदेत शिवसेना आ. नीलम गोर्र्‍हे यांनी लक्षवेधी मांडली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींविरुद्ध कडक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी शिवसेनेबाबत पोलिसांनी पाठविलेला गोपनीय अहवालावर सभागृहात मांडण्याचा प्रयत्न केला. शिवसेना आमदारांनी त्यावर जोरदार आक्षेप घेत सभापतींच्यासमोरील वेलमध्ये धाव घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सदस्यांसोबत खडाजंगी झाली. परिणाम कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. 

पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे तसा अहवाल नाही. पण तो अहवाल काय आहे, हे तपासून पाहिले जाईल. त्यात तथ्य असल्यास योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे सांगितले. 
याबाबत माहिती अशी की, योगीराज गाडे या शिवसेना नगरसेवकाने दि. 6 एप्रिल 2018 ला जिवाला धोका असल्याबाबत व केडगाव नगरसेवक निवडणुकीबाबत माजलेली अशांतता यावर पोलिसांना निवेदन दिले होते. त्याची छायांकित प्रत मुख्यमंत्र्यांना सादर केली. या निवेदनाची दखल संबंधित पोलिस अधिकार्‍यांनी वेळेवर घेतली असती, तर हा प्रकार घडलाही नसता. मात्र, नगरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अक्षय शिंदे व पोलिस निरीक्षक अभय परमार यांचेकडून दुर्लक्ष झाले.

त्यामुळे केडगाव दुहेरी हत्याकांडाचा प्रसंग ओढवून दोन जीव गमावले. संबंधित पोलिस अधिकार्‍यांवर हलगर्जीपणा केला म्हणून कारवाई करावी, अशी मागणी आ. डॉ. नीलम गोर्‍हे, आ. अनिल परब, आ. रविंद्र फाटक यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ज्या-ज्या पोलिस अधिकार्‍यांनी हलगर्जीपणा केला, त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल. तसेच अतिरिक्त पुरवणी आरोपपत्रांसाठी न्यायालयाची परवानगी घेतली आहे. अ‍ॅड. उज्वल निकाम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे. संशयितांचे कॉल रेकॉर्डस तपासणार आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पोलिस अधीक्षकांनी पोलिस महासंचालकांना पाठविलेला गोपनीय अहवाल मांडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात शिवसेनेने राजकारण केले, असा ठपका ठेवण्यात आला होता. मुंडे यांनी हा अहवाल मांडण्याचा प्रयत्न करताच शिवसेना आमदारांनी यावर जोरदार हरकत घेतली. असे अहवाल गोपनीय असतात, ते माहितीच्या अधिकारात मिळत नाही. म्हणून हा अहवाल अधिकृत कसा मानायचा, असा प्रश्न आ. अनिल परब यांनी विचारून हरकत घेतली.

परंतु, तालिका सभापतींनी तरीही विरोधी पक्षनेत्यांना तो ’कथित’ अहवाल सादर करण्याची परवानगी दिली. त्यामुळे शिवसेना नगरसेवक अधिक आक्रमक झाले. आ.अनिल परब, आ. नीलम गोर्‍हे, आ. रवींद्र फाटक, आ. नरेंद्र दराडे, आ. विलास पोतनीस, आ. किशोर दराडे यांनी सभापतींसमोरच्या वेल मध्ये धाव घेतली. यात शिवसेना व राष्ट्रवादीच्या सदस्यांशी खडाजंगी झाली. सभापतींनी सभागृहाचे कामकाज काही काळ स्थगित केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर मुख्यमत्र्यांनी म्हणणे सादर करून तथ्य असल्यास योग्य कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले.