Tue, Mar 26, 2019 07:40होमपेज › Ahamadnagar › ‘छिंदम’च्या उपस्थितीने महासभेत गोंधळ!

‘छिंदम’च्या उपस्थितीने महासभेत गोंधळ!

Published On: Aug 03 2018 1:33AM | Last Updated: Aug 02 2018 11:51PMनगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या श्रीपाद छिंदमने गुरूवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला पोलिस बंदोबस्तात हजेरी लावल्याने गोंधळ उडाला. छिंदमच्या उपस्थितीला विरोध करणार्‍या 10 शिवप्रेमींवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत ताब्यात घेतले. छिंदमने सभागृहात येऊन रजिस्टरवर हजेरीची नोंद केल्यानंतर नगरसेवकांनी घोषणाबाजी केली. विरोधकांनी सभात्याग करत असल्याची घोषणा करताच, महापौर सुरेखा कदम यांनी सभा तहकूब केली.

काही दिवसांपूर्वी गाळेधारकांच्या प्रश्‍नावर आयोजित विशेष महासभेला उपस्थित राहण्यासाठी छिंदमने पोलिस बंदोबस्ताची मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी बंदोबस्त दिला नव्हता. उड्डाणपुलासाठी भूसंपादन, एलईडी प्रकल्प, नेहरू मार्केटचे धोरण ठरविणे व मागील सभांचे इतिवृत्त मंजूर करण्यासाठी गुरूवारी महापालिकेची सभा बोलाविण्यात आली होती. 

महापालिकेच्या ठरावानंतरही अद्याप छिंदमचे नगरसेवकपद रद्द झालेले नाही. त्यामुळे महापालिकेकडून त्याला रितसर सभेचा अजेंडा पाठविण्यात आला होता. छिंदमने या सभेला उपस्थित राहण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली होती. पोलिसांकडून बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आला. छिंदमच्या उपस्थितीतमुळे निर्माण होणारी संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी मनपा आवारात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. छिंदम उपस्थित राहणार असल्याची कुणकुण लागल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह काही शिवप्रेमींनी मनपात येऊन निदर्शने केली. बंदोबस्त उपलब्ध करून दिल्याबद्दल निषेधाची घोषणाबाजी सुरू झाल्यानंतर पोलिसांनी 10 शिवप्रेमींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

छिंदम सभेला उपस्थित राहणार असल्याच्या शक्यतेने तणाव निर्माण झाला होता. अशा परिस्थितीतच दुपारी 1 वाजता सभेला सुरुवात करण्यात आली. सभेत दुखवट्याच्या प्रस्तावावर श्रद्धांजली सुरू असतानाच पोलिस बंदोबस्तात छिंदमने महापालिकेत हजेरी लावली. सभागृह नेेते गणेश कवडे यांनी छिंदमला सभागृहात येण्यास विरोध करून घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर सर्वच सदस्यांनी सभागृहात घोषणाबाजी सुरू केल्यामुळे गोंधळ उडाला. या गोंधळातच छिंदमने व्यासपीठावर हजेरी लावून रजिस्टरवर नोंद केली. नगरसेवकपद रद्द करण्याच्या ठरावाचे इतिवृत्त कायम करु नये, अशा मागणीचे निवेदनही त्याने महापौरांकडे सोपवत, पोलिस बंदोबस्तातच महापालिकेतून काढता पाय घेतला.

छिंदमचे निवेदन स्वीकारण्यावरून शिवसेनेसह विरोधी सदस्यांनी महापौरांना घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी महापौर सुरेखा कदम यांनी नगरसेवकांना चांगलेच ठणकावले. त्यानंतर छिंदमने गुरूवारच्या सभेला हजेरी लावल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी सभात्याग करत असल्याची घोषणा केली. सभागृहात सुरू झालेल्या गोंधळामुळे महापौर कदम यांनी ही सभा शुक्रवारपर्यंत तहकूब करत असल्याचे जाहीर केले.