होमपेज › Ahamadnagar › प्रभागांतील परिसराबाबत संभ्रम कायम!

प्रभागांतील परिसराबाबत संभ्रम कायम!

Published On: Aug 28 2018 1:18AM | Last Updated: Aug 27 2018 10:14PMनगर : प्रतिनिधी

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचनेची व्याप्ती, प्रभागात समाविष्ट असलेल्या परिसरांची सविस्तर माहिती असलेले राजपत्र सोमवारी (दि.27) सायंकाळी उशिरापर्यंत मनपाकडे उपलब्ध न झाल्यामुळे प्रभागाच्या रचनेचा संभ्रम अद्यापही कायमच राहिला आहे. परिणामी, महापालिका प्रशासनाने आरक्षण सोडतीवेळी प्रकाशित केलेले भाग नकाशेच संकेतस्थळावर तसेच कार्यालयात प्रसिध्द केले आहेत. यात प्रभागाची सविस्तर माहिती नसल्याने हरकती नोंदवायच्या कशा? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करतांना 24 ऑगस्टला आरक्षण सोडत व 27 ऑगस्टला प्रारुप प्रभाग रचना राजपत्रात प्रसिध्द करण्याचे निर्देश दिले होते. तसेच 27 ऑगस्टपासून 5 सप्टेंबरपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत हरकती नोंदविण्याची मुदत दिलेली आहे. 24 ऑगस्टला मनपा प्रशासनाने आरक्षण सोडत काढतांनाच प्रभागाची थोडक्यात व्याप्ती व चतुःसिमा दर्शविणारे भाग नकाशे प्रसिध्द केले आहेत. यात प्रभागाची ढोबळ रचना समोर आली असली तरी प्रत्यक्षात प्रभागात समाविष्ट असलेल्या परिसराची माहिती उपलब्ध झालेली नाही. सोमवारी राजपत्र प्रसिध्द झाल्यानंतर याची माहिती मिळणार होती. त्यासाठी राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह इच्छुकांनी महापालिकेत गर्दी केली होती.

प्रशासनाने आरक्षण सोडतीनंतर तयार केलेला रचेनचा प्रस्ताव राजपत्रात प्रसिध्दीसाठी सादर केलेला आहे. मात्र, काल सायंकाळपर्यंत याची प्रत महापालिकेकडे उपलब्ध न झाल्यामुळे महापालिकेला केवळ भाग नकाशेच प्रसिध्द करता आले. यात प्रभागाची सविस्तर माहिती नसल्यामुळे इच्छुकांची अडचण झाली आहे. आयोगाने हरकती नोंदविण्यासाठी 27 ऑगस्टपासूनच मुदत दिली आहे. मात्र, सविस्तर प्रभाग रचनाच उपलब्ध न झाल्यामुळे हरकती नोंदवायच्या कशा? असा सवाल इच्छुकांसमोर निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राजपत्र 27 ऑगस्टला प्रसिध्द होऊन सर्वांसाठी खुले होणे आवश्यक होते.