Mon, Jul 22, 2019 13:11होमपेज › Ahamadnagar › दूध दरवाढ आंदोलनाला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

दूध दरवाढ आंदोलनाला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

Published On: Jul 17 2018 1:28AM | Last Updated: Jul 17 2018 12:03AMनगर : प्रतिनिधी

दूध दरवाढीसाठी पुकारलेल्या आंदोलनाला जिल्ह्यात सोमवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. एकूण 40 कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली असून, तर 350 जणांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत.

दूधाला 27 रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी राज्यभरात दूधबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव, संगमनेर, अकोले, राहुरी, पारनेर, पाथर्डी, नगर या तालुक्यातील शेतकर्‍यांनी सहभाग नोंदवत मोफत दूध वाटप केले. तर काही ठिकाणी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. दूधसंघ चालकांनीही या आंदोलनास पाठिंबा दर्शविला. जिल्ह्यातील 165 संकलन केंद्रात दररोज सुमारे 24 लाख लिटर दुधाचे संकलन व वितरण होते. मात्र, आंदोलनामुळे ते बंद असल्याने, सुमारे 5 ते 6 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून दुधाच्या टँकरला संरक्षण देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार काल (दि. 16) दुपारपर्यंत 20 टँकर पोलिस बंदोबस्तात जिल्ह्याबाहेर रवाना करण्यात आले. जे टँकर पोलिस बंदोबस्त मागेल, त्यांना बंदोबस्त देण्याची तयारी पोलिस प्रशासनाने दर्शविली आहे. दूध संकलन केंद्राचे नुकसान होऊ नये, यासाठी त्यांना पोलिस संरक्षण पुरविण्यात आलेले आहे. पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. त्यांच्याकडून सतत जिल्ह्यातून आढावा घेतला जात आहे. 

रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शिर्डी येथील साईबाबा मंदिराच्या गेट नंबर 4 समोरील रस्त्यावर साईबाबांच्या मूर्तीवर दूध अभिषेक घालून कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, दिनेश वराळे, अरुण डौले, किशोर वराळे, गोविंद वरघुडे (सर्व रा. राहुरी तालुका) या पाच जणांविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. 

आंदोलन चिघळू नये, यासाठी पोलिसांनी यापूर्वी शेतकरी आंदोलनासंबंधी गुन्हे दाखल असलेल्या कार्यकर्त्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 149 अन्वये सुमारे 350 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सीआरपीसी 151 अन्वये 20 जणांना ताब्यात घेऊन त्यांना तालुका दंडाधिकार्‍यांसमोर हजर करून प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले. तसेच 15 जणांना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.