नगर : प्रतिनिधी
पेट्रोल, डिझेलच्या सतत होणार्या दरवाढीच्या निषेधार्थ काँगे्रसने पुकारलेल्या ‘भारत बंद’ला जिल्ह्यात सोमवारी (दि.10) संमिश्र प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काँगे्रस, राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकार्यांनी शांततेत बंद पाळला. सर्व बाजारपेठांतील व्यवहार सुरळीत होते. परिस्थिती पाहून सकाळपासून बंद ठेवण्यात आलेली एसटी बससेवाही दुपारी सुरू करण्यात आली.
नगर शहरात काँगे्रस व राष्ट्रवादी काँगे्रसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित धरणे आंदोलन केले. त्यामध्ये राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्यासह दोन्ही काँगे्रसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना विविध पक्षांच्या वतीने निवेदन देण्यात आले. दोन दिवसांवर आलेला गणेशोत्सव व नंतर येणारा मोहरम या सणांच्या पार्श्वभूमीवर व्यापारीवर्ग, सार्वजनिक मालमत्ता तसेच नागरिकांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत शांततेत आंदोलन करण्यात आले.
काँगे्रसचे आमदार असलेल्या संगमनेर, राहाता, श्रीरामपूर तालुक्यांत बंदला काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला. तेथील व्यावसायिकांनी व्यवहार बंद ठेवून बंदला पाठिंबा दर्शविला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आ. बाळासाहेब थोरात व आ. भाऊसाहेब कांबळे यांच्यासह त्या त्या तालुक्यांतील काँगे्रसच्या पदाधिकार्यांनी तहसीलदारांना निवेदने देऊन शांततेत बंद पाळला. पारनेर तालुक्यातही पंचायत समिती सभापती राहुल झावरे यांच्यासह पदाधिकार्यांनी बंद पाळून तहसीलदार गणेश मरकड यांना निवेदन दिले.
वेळोवेळी पुकारण्यात येत असलेल्या बंदमध्ये एसटी बसचे मोठे नुकसान होत असल्याने, सोमवारी (दि.10) सकाळपासूनच जिल्ह्यातील अनेक आगारांतील काही मार्गांवरील बससेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र, नंतर परिस्थिती पाहून दुपारनंतर बससेवा सुरू करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक विजय गिते यांनी सांगितले. बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळी काही ठिकाणी बंद ठेवण्यात आलेली दुकाने नंतर उघडण्यात आली. त्यामुळे सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू होते.