Sat, Mar 23, 2019 16:44होमपेज › Ahamadnagar › वाळूतस्करांवरील कारवाईचे ‘टार्गेट’ पूर्ण

वाळूतस्करांवरील कारवाईचे ‘टार्गेट’ पूर्ण

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 25 2018 9:52PMपारनेर : प्रतिनिधी

अवैध वाळूउपशास पायबंद घालण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत गेल्या तीन दिवसांत तालुक्यात अवैध वाळू वाहनारी पाच वाहने ताब्यात घेण्यात आली. या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेले ‘टार्गेट’ पारनेर तहसील कार्यालयाने पूर्ण केले आहे.

राहुरीच्या तहसीलदार आणि महसूलसह पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला झाल्याच्या पार्श्‍वभूमिवर अवैध वाळू उपसा व वाहतुकीस पायबंद घालण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी व पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या उपस्थितीत नगर येथे झालेल्या बैठकीत कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या. वाळूची चोरी करणारी किमान पाच वाहने प्रत्येक तहसील कार्यालयाने पकडावीत, असे ‘टार्गेट’ जिल्हाधिकार्‍यांनी या बैठकीत सर्व तहसीलदारांना दिले होते. त्यानुसार तहसिदार भारती सागरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मोहीम राबवून अवैध वाळू वाहणारी पाच वाहने ताब्यात घेतली. मुळा नदीपात्रातून चोरी केलेल्या वाळूची वाहतूक करणारी दोन वाहने वनकुटे परिसरातून चालली असताना पथकाने ती तहसीलदारांच्या पथकाने पकडली. दोन्ही वाहने ताब्यात घेण्यात येऊन ती तहसील व पोलिस ठाण्याच्या अवारात लावण्यात आली. पथक कडूस भागात असताना तेथेही एक ट्रक वाळूची वाहतूक करताना आढळून आला. हा ट्रक ताब्यात घेण्यात येऊन सुपे पोलिस ठाण्याच्या आवारात लावण्यात आला. मुळा नदीपात्राच्या परिसरात एक ट्रक तसेच ट्रॅक्टरवरही अशाच प्रकारची कारवाई करून दोन्ही वाहने ताब्यात घेण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर पारनेरच्या पथकाने सर्वाधिक पाच वाहनांवर कारवाई करून जिल्हयात आघाडी घेतली आहे. 

दरम्यान, विना क्रमांकाच्या वाहनांमधून होत असलेल्या वाळू वाहतुकीवरही कारवाई करण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. परंतु या निर्णयानंतरही अनेक वाहने विनाक्रमांकाची धावत असून उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी अशा वाहनांवर अद्याप कारवाई केली नसल्याबद्दल अश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे.  मागील महिन्यात प्रांताधिकारी गोविंद दाणेज यांनी वाळू वाहतूक करणारा डंपर ताब्यात घेउन तहसील कार्यालयाच्या आवारात  लावला होता. मात्र दुसर्‍याच दिवशी डंपरच्या मालकाने तो आवारातून पळवून नेला. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल होऊनही अद्याप काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. हे वाहन दिवसा ढवळ्या तहसील तसेच पोलिस ठाण्याच्या अवारातून जात, येत असताना त्यावर कारवाई का होत नाही, असा सवाल करण्यात येत आहे. या वाहनावरील दंडात्मक कारवाईदेखील संशयाच्या भोवर्‍यात आहे.

मुळा नदीपात्रात सुमारे 28 ते 30 यांत्रीक उपकरणांच्या मदतीने वाळूचा उपसा रात्रंदिवस करण्यात येतो. महसूल विभागातीलच काही कर्मचारी कारवाईसाठी पथक येणार असल्याची माहिती तस्करांपर्यंत पोहचवितात व पथकाच्या हाती काहीही लागत नाही. जिल्हाधिकार्‍यांनी झारीतील या शुक्राचार्‍यांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. 

जवळे, सांगवीतही कारवाई व्हावी !

तालुक्यातील जवळे, सांगवीसुर्या, कोहकडी आदी भागातही मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असून तेथेही कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. महसूलच्या पथकाने या परिसरात तळ ठोकला होता. परंतु  त्याची कुणकूण लागल्याने तस्करांनी यांत्रिक उपकरणे तसेच वाहने गायब करून पथकास रात्र जागून काढायला लावली!