Sat, Jul 20, 2019 08:42होमपेज › Ahamadnagar › पुरुषांच्या छळाच्याही तक्रारी : रहाटकर

पुरुषांच्या छळाच्याही तक्रारी : रहाटकर

Published On: Jul 13 2018 12:47AM | Last Updated: Jul 13 2018 12:12AMनगर : प्रतिनिधी

समाजातील प्रत्येक घटकांतील महिलांना न्याय मिळावा, यासाठी महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. नगरच्या सुनावणीत पुरुषांच्या छळाच्याही तक्रारी होत्या. त्या जाणून घेत समुपदेशनातून वाद मिटविण्यात आले, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी काल (दि. 12) पत्रकारांशी बोलताना सांगितले.यावेळी उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे, पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी, बालसंरक्षण अधिकारी वैभव देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, परिविक्षा अधिकारी संध्या राशीनकर, कोल्हापूरचे जिल्हा समन्वयक आनंदा शिंदे, प्रकल्प अधिकारी कशकिना शरिफ, पोलिस उपनिरिक्षक कल्पना चव्हाण, आदी उपस्थित होते. 

रहाटकर म्हणाल्या की, जनसुनावणीत 30 महिलांच्या व 10 पुरुषांच्या तक्रारी होत्या. त्यातील काही तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यात आला. काही जोडप्यांना समुपदेनासाठी पाठविण्यात आलेले आहे. नगरच्या जनसुनावणीत विभक्त होण्याचा निर्णय घेतलेल्या जोडप्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यातील 6 जोडपी पुन्हा एकमताने संसारात रमली आहेत. महिलांच्या तक्रारीत 60 टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाण वैवाहिक तक्रारींचे आहे. महिलांवरील अत्याचार दूर करून त्यांना न्याय देण्यासाठी राज्य महिला आयोग काम करीत आहेत. आयोगामार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. जनसुनावणी दरम्यान नव्या तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपली समस्या मांडणार्‍यांना त्वरीत दिलासा देण्याचे काम आयोगाद्वारे करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात 1 हजार 500 तक्रारी मार्गी लावण्यात आल्या. यात जिल्हापातळीवरील तक्रारींचा समावेश नाही.

चौकशीनंतर समुदेशन केंद्रावर कारवाई

आयोगाच्या निधीतून नगरला स्वयंसेवी संस्थेमार्फत जे समुपदेशन केंद्र चालविले जाते त्यात आर्थिक व्यवहार होत असल्याच्या तक्रारींबाबत बोलताना रहाटकर म्हणाल्या की, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, ‘दिलासा सेल’कडे आलेल्या तक्रारींची चौकशी केली जाईल. चौकशीत तथ्य आढळल्यास संबंधित केंद्रावर कारवाई करण्यात येईल.

‘तो’ अहवाल बोगस

पाकिस्तानपेक्षा भारतात महिलांवर जास्त अत्याचार होतो, असा एका संस्थेने काही दिवसांपूर्वी अहवाल दिला होता. तो अहवाल बोगस आहे. देशात शंभर कोटींपेक्षा जास्त लोक राहतात आणि 517 लोक कुठलाही अभ्यास न करता चुकीचा अहवाल सादर करतात, हे कसल्याही परिस्थिती मान्य होऊच शकत नसल्याचे रहाटकर यांनी सांगितले.