Sun, Aug 18, 2019 21:12होमपेज › Ahamadnagar › पोलिसांकडील तक्रार अर्जात अर्धवट माहिती!

पोलिसांकडील तक्रार अर्जात अर्धवट माहिती!

Published On: Jan 04 2018 12:59AM | Last Updated: Jan 03 2018 10:08PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

पथदिवे घोटाळ्याच्या आरोपातील कामांच्या ‘फायली’ चोरल्याबाबत फौजदारी फिर्याद दाखल करण्याचे आदेश मनपा आयुक्‍तांनी दिलेले असतांनाही संबंधित अधिकार्‍याने अर्धवट माहितीचा तक्रार अर्ज तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. अर्जात सविस्तर माहिती नसल्यामुळे अद्यापही गुन्हा दाखल झालेला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घोटाळ्यामुळे मनपाची लक्‍तरे वेशीवर टांगली गेलेली असतांनाही प्रशासनाकडून हलगर्जीपणा होत असल्याने संशय निर्माण झाला आहे.

विकासभार व रेखांकन लेखाशीर्षात तरतूद नसतांनाही 19 कामे मंजूर होऊन व सदरच्या कामांपैकी अनेक कामे झालेली नसतांना त्या कामांची बिले अदा करण्यात आल्याचा प्रकार विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी उघड केला होता. गेल्या 5 दिवसांपासून या प्रकरणावर महापालिकेत गदारोळ सुरु आहे. सर्वसाधारण सभेत या मुद्द्यावर माहिती देतांना सदरच्या कामांच्या फायली ठेकेदाराकडेच असल्याचे विद्युत पर्यवेक्षक बाळासाहेब सावळे यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर अभियंता रोहिदास सातपुते यांनी सावळे यांना नोटीस बजावून फायली ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. त्याउपरही फायली मिळत नसल्याने आयुक्‍त घनश्याम मंगळे यांनी या प्रकरणी फौजदारी फिर्याद देण्याचे आदेश दिले असून त्यासाठी बाळासाहेब सावळे यांना प्राधिकृत केले होते.

बाळासाहेब सावळे यांनी काल (दि.3) तोफखाना पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार अर्ज सादर केला आहे. 30 डिसेंबर 2017 पूर्वी ऑफीस वेळेत ठेकेदार सचिन लोटके यांनी 19 फायली चोरुन नेल्याचे त्यांनी अर्जात म्हटले असून या प्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदवून घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. या संदर्भात पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता केवळ तक्रार अर्ज प्राप्त झालेला असून फिर्याद दाखल झालेली नसल्याचे सांगण्यात आले. तक्रार अर्जात फाईल चोरीबाबतचा घटनाक्रम नाही, कोठून नेल्या, त्या कुणाच्या ताब्यात होत्या, फायलींचा क्रमांक, आवक-जावक नंबर अशी कुठलीही माहिती मनपा अधिकार्‍यांकडून तक्रार अर्जात सादर झालेली नाही. माहिती परिपूर्ण नसल्याने अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याचे पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी ‘पुढारी’शी बोलतांना सांगितले. मात्र, तक्रार अर्ज प्राप्त असल्याने येत्या दोन-तीन दिवसांत मनपा अधिकार्‍यांची भेट घेऊन चौकशी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गेल्या 5 दिवसांपासून संपूर्ण शहरात हा घोटाळा चर्चेत आहे. मनपा पदाधिकारी, नगरसेवक व प्रशासनाची लक्‍तरे वेशीवर टांगली गेली आहेत. अशा परिस्थितीत मनपाने प्राधिकृत केलेल्या अधिकार्‍याने साधा तक्रार अर्ज दाखल करुन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र आहे. पोलिस ठाण्यात पोलिसांना अपेक्षित असलेली सविस्तर माहिती सादर करुन, संचिकांची परिपूर्ण माहिती देवून ठेकेदाराविरोधात रितसर फिर्याद देणे आरश्यक असतांनाही अर्धवट माहिती सादर केली जात नसल्याने प्रशासनाला या प्रकरणाचे खरच गांभीर्य आहे का? की प्रशासनातील अधिकारीच राजकीय दबावातून ठेकेदार व दोषींना पाठिशी घालण्यासाठी प्रयत्न तर करीत नाहीत ना? असे सवाल उपस्थित होत आहेत.