Tue, Jul 16, 2019 10:24होमपेज › Ahamadnagar › ‘व्हॅलेंटाईन’च्या दिवशी तरुणांचा संताप

‘व्हॅलेंटाईन’च्या दिवशी तरुणांचा संताप

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 10:26PMपाथर्डी : प्रतिनिधी

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हजारो तरुणांनी रस्त्यावर येत नोकर भरतीच्या मुद्यावरून सरकारवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली. आमदार, खासदारांच्या पगाराला बिनबोभाट संमती  देणार्‍यांनो नोकर्‍या द्या, नाहीतर सत्ता सोडा. तरुणाईने तुम्हाला सत्तेवर बसवले तीच तरुणाई तुम्हाला तुडवल्या शिवाय  राहणार नाही.जिल्हा विभाजन नको, नोकर्‍या द्या अशी मागणी करत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

आंदोलनाचे नेतृत्व विकास नागरगोजे, संजय धायतडक ,अमीर शेख ,प्रमोद आंधळे आदींनी केले. शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत तरुणांनी सद्य परिस्थितीचा घेतलेला आढावा प्रशासनासह उपस्थितांना अस्वस्थ करणारा ठरला.एकाही राजकीय कार्यकर्त्याला तरुणांनी आंदोलनात सहभागी होऊ दिले नाही. जुन्या बसस्थानका पुढील वसंतराव नाईक चौकात राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत  विद्यार्थ्यांनी संतापाच्या भरात ग्रामीण भाषेत राज्यकर्त्यांच्या कारभाराचा उद्धार केला.

यावेळी बोलतांना विकास नागरगोजे म्हणाले, शिक्षण मंत्री तावडेंनी शिक्षक भरतीची आतापर्यंत सहा वेळा घोषणा केली. कालची घोषणासुद्धा फसवी आहे. जाहिरातबाजी पोस्टरबाजीवर जेवढा खर्च झाला त्या खर्चात संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त झाले असते. तुमचे फालतू पोस्टर वाचायला आम्ही शिक्षण घेतलेले नाही. आणीबाणी सारखा  विरोधकांचा  आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका आमच्या भावनेशी खेळू नका आम्ही आत्महत्या करणार नाही तुम्हाला आत्महत्या करायला लावू.आम्हाला फक्त मतदानापुरते ठेवण्याचा कार्यक्रम यशस्वी होऊ देणार नाही.

मुख्यमंत्री म्हणतात शेतकर्‍यांच्या पोरांनी शेती करावी, तुम्ही सुद्धा सत्ता सोडा अन् दहावे व तेरावे घालत बसा. आम्ही एकहाती सत्ता दिली तुम्ही आमचाविश्वास घात केला. मंत्री, पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी महामंडळाचे पदाधिकारी आदींना संरक्षणासाठी पोलिस बळ वापरावे लागते. सरकारला सांभाळायला पोलिस अन्  जनता मात्र वार्‍यावर सोडली आहे. केवळ आश्‍वासने देणार्‍या सरकारला अद्दल घडवावी लागेल.यावेळी विविध वक्त्यांनीनी भाषणे केली. किरण  गुलदगड व अजय पालवे यांनी  मागण्यांचे वाचन केले. निवडणूक नायब तहसीलदार रमेश ससाणे व पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी निवेदन स्वीकारले.