Sun, Jul 21, 2019 07:52होमपेज › Ahamadnagar › अनुकंपा भरतीची चौकशी रखडली!

अनुकंपा भरतीची चौकशी रखडली!

Published On: Jul 22 2018 1:03AM | Last Updated: Jul 22 2018 12:20AMनगर : प्रतिनिधी

2015-16 साली जिल्हा परिषदेत झालेल्या अनुकंपा भरतीच्या संदर्भात तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी अध्यक्षा शालिनी विखे व मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्याकडे दिला होता. अहवालातील त्रुटी पाहिल्यानंतर हा अहवाल पुढील कारवाईसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला. अहवाल पाठविल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरु झाली. मात्र तीन महिने उलटूनही चौकशीत प्रगती न झाल्याने चौकशी रखडली आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी विभागीय चौकशी समिती नियुक्त करण्यात येणार होती. मात्र चौकशी सुरु होऊनही अहवाल अद्यापही विभागीय आयुक्तांना प्राप्त झाला नसल्याची माहिती आहे. 2015-16 साली जिल्हा परिषदेत झालेल्या अनुकंपा भरतीचा चौकशी अहवाल तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी मार्च महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत बंद लिफाफ्यात दिला होता.

मार्च महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत 2016 साली अनुकंपा तत्वावर जिल्हा परिषदेत 25 जणांना नियुक्त्या देण्यात आल्याचा विषय चर्चिला गेला. सेवाजेष्ठता डावलून नियमबाह्य पद्धतीने नियुक्त्या देण्यात आल्याचा आरोप करत सदस्य सुनील गडाख यांनी विभागीय आयुक्तांमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.

त्यावर अध्यक्षा विखे यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल स्थायीच्या सभेत सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थायी समितीची सभा सुरु झाल्यानंतर काही वेळातच डॉ.कोल्हे यांनी अहवाल असलेला लिफाफा माने व विखे यांच्यापुढे सादर केला होता.

भरती करतांना 10 टक्के जागा ग्रामपंचायतच्या कर्मचार्‍यांसाठी राखीव ठेवण्याचा शासन निर्णयही पाळण्यात आलेला नाही. सेवाजेष्ठता डावलत वर्ग 3 मध्ये असलेल्यांना वर्ग 4 मध्ये नियुक्त्या देण्यात आल्या. याप्रकरणी नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले दहा कर्मचारी गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवत आहेत. त्यांनाही या अहवालापासून अपेक्षा आहेत.

कडक शिस्तीचे म्हणून जिल्हा परिषद प्रशासनात दरारा राहिलेल्या डॉ. कोल्हे नुकतीच स्वेच्छानिवृत्ती घेतली. जाता-जाता त्यांनी दिलेल्या शेवटच्या अहवालात नेमकं दडलयं तरी काय? याबाबत उत्सुकता लागली आहे. चौकशी अहवालावरील कारवाईत कुणाची ‘दिवाळी’ साजरी होणार? आणि कुणाचे ‘दिवाळे’ निघणार? याबाबत जिल्हा परिषद वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.