Mon, Jun 24, 2019 17:30होमपेज › Ahamadnagar › अनुकंपा भरती चौकशी सुरू

अनुकंपा भरती चौकशी सुरू

Published On: Mar 25 2018 1:44AM | Last Updated: Mar 24 2018 11:45PMनगर : प्रतिनिधी

2015-16 साली जिल्हा परिषदेत झालेल्या अनुकंपा भरतीची चौकशी सुरु झाली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी यासंबंधीचे दस्तऐवज तपासल्याचे सूत्रांनी सांगितले. चौकशीचा अहवाल 26 रोजी होणार्‍या स्थायीच्या सभेत अवलोकनार्थ ठेवण्यात येणार असल्याने सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2016 साली अनुकंपा तत्वावर जिल्हा परिषदेत 25 जणांना नियुक्त्या देण्यात आल्या. सेवाजेष्ठता डावलून नियमबाह्य पद्धतीने नियुक्त्या देण्यात आल्याचा आरोप करत सदस्य सुनील गडाख यांनी विभागीय आयुक्तांमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सर्वसाधारण सभेत केली होती. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे हे या प्रकरणी चौकशी करून स्थायी समितीच्या सभेत अहवाल ठेवतील व हा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी दिले होते.

त्यानुसार डॉ. कोल्हे यांनी सामान्य प्रशासन विभागातील सर्व कर्मचार्‍यांना पाचारण केले होते. भातीसंदर्भातील सर्व माहिती व कागदपत्रे कोल्हे यांनी तपासल्याचे कळते. चौकशीचा अहवाल तयार करून स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर हा अहवाल विभागीय आयुक्तांकडे कारवाईसाठी पाठविण्यात येईल.

गडाख यांनी सर्वसाधारण सभेत अनुकंपा भरतीवरून गंभीर आरोप केले होते. याच मुद्द्यांवरून त्यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांना चांगलेच धारेवर धरले होते. मागील सभेत गडाख यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला दिलेल्या उत्तरावर नापसंती व्यक्त करत गडाखांनी यादवांवर प्रश्नांची सरबत्ती केली होती. सुरुवातीला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करणार्‍या यादव यांनी नंतर मात्र चुप्पी साधल्याचे दिसून आले होते.

भरती करतांना 10 टक्के जागा ग्रामपंचायतच्या कर्मचार्‍यांसाठी राखीव ठेवण्याचा शासन निर्णयही पाळण्यात आला नाही. सेवाजेष्ठता डावलत वर्ग 3 मध्ये असलेल्यांना वर्ग 4 मध्ये नियुक्त्या देण्यात आल्या. अनुकंपा भरती प्रकरणात कागदपत्रात फेरफार केल्यावरून सामान्य प्रशासन विभागातील दोघा कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले आहे. त्यामुळे यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होते. सामान्य प्रशासन विभाग सभागृहाला वारंवार दिशाभूल करत असेल तर आमचे राजीनामे घ्या, असा आक्रमक पवित्रा गडाख यांनी घेतला होता.

गडाख यांनी केलेल्या आरोपांप्रमाणे अनुकंपा भरतीत अनियमितता असल्यास जिल्हा परिषदेसाठी हा मोठा कलंक असणार आहे. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांसाठी राखीव असलेल्या दहा टक्के जागांसाठी प्रयत्न करणार्‍या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचेही चौकशी अहवालाकडे लक्ष आहे.

Tags : ahmadnagar, Compassionate Requrtment,  Inquiry,  process, Says, Additional CEO, Ashok kolhe,