Wed, May 22, 2019 14:53होमपेज › Ahamadnagar › समिती सदस्य जाणार अंगणवाड्यांच्या भेटीला

समिती सदस्य जाणार अंगणवाड्यांच्या भेटीला

Published On: Aug 05 2018 1:28AM | Last Updated: Aug 05 2018 1:28AMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातल्या अंगणवाड्यांमध्ये शिकत असलेल्या बालकांना दर्जेदार आहार मिळावा यासाठी महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार समितीचे सदस्य बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांसमवेत अंगणवाड्यांना भेटी देऊन दर्जेदार आहाराबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीची सभा सभापती अनुराधा नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेस सदस्य रोहिणी निघुते, मीरा शेटे, अनुसया होन, मनिषा ओहोळ यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम व सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

गेल्या वर्षी अंगणवाड्यांमध्ये पोषण आहारात किडे, अळ्या, लाकडाचा भुसा आढळून आला होता. स्वतः जिल्हा परिषद सदस्याने हा प्रकार उघडकीस आणला होता. याबाबत चौकशी केली असता जिल्हा परिषदेने पोषण आहार गुणवत्तापूर्ण असल्याचे सांगत प्रकरणाला ‘क्लीन चिट’ दिली. गेल्या वर्षी  सदस्य यंदा जागृत झाले आहेत. त्यानुसारच समिती सदस्य अंगणवाड्यांच्या भेटीला जाण्याचा निर्णय घेण्यात आला. पोषण आहारात देण्यात येणार्‍या टीएचआर पाककृतीच्या साहित्यामध्ये झालेल्या बदलाची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी कदम यांनी दिली. कुपोषित मुलांसाठी बाळ उपचार केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्र अधिक सक्षम करून जास्तीत जास्त मुलांना लाभ मिळण्यासाठी प्रबोधन करण्यात येणार आहे.

अंगणवाड्यांच्या इमारत बांधकामासाठी शासनाने 6 लाखांची मर्यादा घातली आहे. वास्तविक पाहता जीएसटी व बांधकाम साहित्याचे वाढलेले दर यामुळे सहा लाखांमध्ये बांधकाम शक्य नसल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे.  त्यामुळे या रकमेत वाढ करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. तसेच अंगणवाडीची इमारत पूर्ण झालेली नसल्यास, खराब असल्यास ताबे पावती न देण्याच्या सूचना सभापती नागवडे यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्ह्यातल्या सर्व बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांनी अंगणवाडी स्तरावर सुरु असलेल्या बाल ग्राम विकास केंद्राची माहिती तसेच लिंग गुणोत्तर प्रमाण, कुपोषणाची माहिती सभेत सादर केली.