Mon, Aug 19, 2019 18:32होमपेज › Ahamadnagar › श्रीरामपुरात कोम्बिंग ऑपरेशन

श्रीरामपुरात कोम्बिंग ऑपरेशन

Published On: Mar 12 2018 1:03AM | Last Updated: Mar 11 2018 10:55PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

शहर व तालुका पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवत चेन स्नॅचिंग, अजामीनपात्र, तडीपार आरोपी, अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर कारवाई, दरोड्याच्या तयारी असलेले दरोडेखोर, संशयितरित्या फिरणारे, तसेच भुरट्या चोर्‍या करणारे यासह अनेक गुन्ह्यांतील सुमारे 31 आरोपींना गजाआड केले. तसेच श्रीरामपूर शहरातील इराणी गल्लीतून 8 संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईसाठी 14 पोलिस अधिकारी व जिल्हाभरातील 104 पोलिस कर्मचार्‍यांचा ताफा तैनात होता.

जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हे श्रीरामपूर शहर व तालुका पोलिस ठाण्यांच्या हद्दीत हे ऑपरेशन राबविण्यात आले.

यामध्ये श्रीरामपूर शहर व तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील नॉन बेलेबल वॉरन्टमधील सचिन उर्फ लक्ष्मण दारगोजी, सोमनाथ कुदळे, अक्षय उर्फ सोनू पिंपळे, सागर कांबळे, नंदकुमार लोळगे, किरण सोनवणे, बापूसाहेब गोरे, भाऊसाहेब शंकर कांबळे, आनंदा मोरे, सुगंध्या काळे या 10 जणांना अटक करण्यात आली.

 श्रीरामपूर हद्दीतून तडिपार प्रकाश रणनवरे यालाही पकडले. चेन स्नेचिंगमध्ये फरार सागर काळभोर, आदिनाथ पोळ, संतोष लोनके यांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी संगमनेर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. शिरसगावच्या हद्दीत उड्डाण पुलाच्याखाली दरोडा टाकण्याच्या तयारीतील मोहमंद आलम (वय 24, रा. सूतगिरणी फाटा, श्रीरामपूर), मोहंमद आबिद शेख, विनोदकुमार गंगा भगत, अंकितकुमार परमानंद मलाकार, मदन गंगा भगत, मोहंमद ग्यासउद्दिन, पप्पू गंगा भगत, शजबिर वेदानंद यादव, रनबीर किशटिया यादव (सर्व सूतगिरणी फाटा, श्रीरामपूर, मूळ रा. बिहार) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चाकू, रांगोळी, मिरची पूड, नायलॉन दोरी, लाकडी दांडके, लोखंडी गज आदी साहित्य जप्त करण्यात आले. 

श्रीरामपूर शहरालगत गोंधवणी, गणेशनगर, भैरवनाथनगर याठिकाणच्या अवैध गावठी हातभट्टीच्या दारूअड्ड्यावर छापा टाकून सुमारे 24 हजार 500 रुपयांचा माल 7 आरोपींकडून जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे तकदीर शहा, युसूफ इराणी, हानिफ खान, इम्रान खान, विठ्ठल उर्फ राजू ननवरे हे शहरात काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या फिरताना आढळून आल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. तसेच युसूफ इराणी, दारूद इराणी, बरकतअली सय्यद हे भुरट्या चोर्‍या करण्याच्या उद्देशाने मिळून आले.