Sat, Jan 19, 2019 03:25होमपेज › Ahamadnagar › दिव्यांगांसाठी होणार महाविद्यालय

दिव्यांगांसाठी होणार महाविद्यालय

Published On: Aug 17 2018 1:33AM | Last Updated: Aug 17 2018 1:33AMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय सुरु करण्यासाठी शासनाने प्रस्ताव मागविले होते. या प्रस्तावाला जिल्ह्यातील दिव्यांग अनुदानित शाळांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दिव्यांग स्वयंसहाय्य सेवा संस्थांनी अपंग महाविद्यालय सुरु करण्यासाठी प्रस्ताव दिल्यास समाजकल्याण विभाग त्याचा पाठपुरावा करणार असून, जिल्ह्यात दिव्यांगांसाठी महाविद्यालय सुरु होणार असल्याची माहिती सभापती उमेश परहर यांनी दिली.

समाजकल्याण समितीची सभा सभापती परहर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेस सदस्य सोनाली साबळे, सुषमा दराडे, संगीता गांगर्डे, कांतीलाल घोडके, संगीता दुसुंगे, मंगल पवार, निशा कोकणे, पुष्पा शेळके यांच्यासह जिल्हा समाजकल्याण अधिकारी नितीन उबाळे उपस्थित होते. सभेच्या सुरुवातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

गेल्या बैठकीत जिल्ह्यात अपंग महाविद्यालय सुरु करण्यासाठी अनुदानित व विनानुदानित शाळांकडून प्रस्ताव मागविण्याचा ठराव घेण्यात आला होता. त्यानुसार प्रस्ताव मागविण्यात आले. परंतु जिल्ह्यातील कोणत्याही दिव्यांग शाळांकडून त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता दिव्यांग स्वयंसहाय्य सेवा संस्थांनी प्रस्ताव दिल्यास त्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या 20 टक्के सेस निधीतून मागासवर्गीयांसाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये मागासवर्गीय मुलींना व मुलांना सायकल पुरविणे, शेतकर्‍यांना कडबाकुट्टी यंत्र पुरविणे, मागासवर्गीय वस्तीत जोडरस्ते बांधणे, दिवाबत्तीची सोय करणे, समाजमंदिराचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी अर्थसहाय्य देणे, समाजमंदिरांसाठी चटई, सतरंजी पुरविणे आदी योजनांचा समावेश आहे. या योजना राबविण्यासंदर्भात सभेत चर्चा करण्यात आली.

जिल्हा परिषद 5 टक्के दिव्यांग सेस अंतर्गत अपंग-अपंग विवाहांसाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे, अतितीव्र दिव्यांग पाल्यांना अर्थसहाय्य देणे, दिव्यांग महिला व पुरुषांना तीन चाकी सायकलसाठी अर्थसहाय्य देणे, अशा विविध योजनांवर सभेत चर्चा करण्यात आली. तसेच अंधव्यक्तींना मोबाईलसाठी अर्थसहाय्य देणे, बहुविकलांग व्यक्तींना अर्थसहाय्य देणे, दिव्यांग पाल्यांच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य देणे या योजनांच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली.