होमपेज › Ahamadnagar › ‘जलयुक्‍त’ची कामे तात्काळ पूर्ण करा

‘जलयुक्‍त’ची कामे तात्काळ पूर्ण करा

Published On: May 31 2018 1:33AM | Last Updated: May 30 2018 11:48PM



नगर : प्रतिनिधी

जलयुक्त शिवार अभियानातील सन 2017-18 मधील पूर्ण झालेल्या कामांची देयके तपासून आणि योग्य ती दक्षता घेऊन अदा करा आणि ज्या यंत्रणांची अद्यापही काही कामे सुरु झाली नसतील त्यांनी ती तात्काळ सुरु करावीत, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात काल (दि.30)  जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे तसेच गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल  द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, उपमहावनसंरक्षक आदर्श रेड्डी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  सुधाकर भोर,  उपजिल्हाधिकारी वामनराव कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे आदींची उपस्थिती होती.

गेल्या बैठकीत  सन 2016-17 मधील पूर्ण झालेल्या कामांचे जिओ टॅगिंग करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या होत्या. काही यंत्रणांनी या कामात चांगली प्रगती दाखवल्याने त्यांनी या यंत्रणांचे कौतुक केले. कृषी, लघुसिंचन, जलसंधारण-जलसंपदा, वन विभाग आणि गटविकास अधिकारी यांनी त्यांच्याकडील कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी. येत्या 15 जूनपर्यंत सन 2017-18 या अभियानातील कामे पूर्ण केली पाहिजेत, असे त्यांनी बजावले.

पाऊस सुरु झाल्यानंतर कामे पूर्ण करण्यासाठी अडचणी येतील. त्यामुळे सर्व यंत्रणांनी  यादृष्टीने खबरदारी घेऊन कार्यवाही करणे अपेक्षित आहे. याशिवाय, सन 2018-19 मध्ये निवडण्यात आलेल्या गावांमध्ये ज्या ठिकाणी  कामे सुरु करणे शक्य आहे, तेथील कामे सुरु करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.