Tue, Mar 19, 2019 20:26होमपेज › Ahamadnagar › जामखेडमध्ये दूध डेअरी संचालकांकडून संकलन बंद

जामखेडमध्ये दूध डेअरी संचालकांकडून संकलन बंद

Published On: Jul 17 2018 1:28AM | Last Updated: Jul 16 2018 11:33PMजामखेड : प्रतिनिधी

दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यावर प्रतीलीटर पाच रुपयांचे अनुदान त्वरीत जमा करावे, या मागणीसाठी तालुक्यातील खर्डा येथे रस्त्यावर दूध ओतून शेतकर्‍यांनी आंदोलन करून पाठिंबा दिला. तसेच आंदोलनास खर्डा, अरणगाव, नान्नज जवळा व जामखेड येथील दूध डेअरी संचालकांनी दूध संकलन केंद्र बंद करून पाठिंबा दिला. 

दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यावर प्रतीलीटर पाच रुपयांचे अनुदान त्वरीत जमा करावे, या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाला जामखेड तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

सकाळी खर्डा येथील बसस्थानकासमोरील शिर्डी-हैदराबाद रोडवर दूध उत्पादक शेतकर्‍यांनी आपल्याकडील असलेले दूध रस्त्यावर ओतून शासनाच्या विरोधात ‘कोण म्हणतं देणार नाही घेतल्या शिवाय रहाणार नाही, अशा घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. तसेच जोपर्यंत दुधाची भाववाढ होत नाही तोपर्यंत तालुक्यातील दुधाचा एक थेंबही मुंबईला जाऊ देणार नाही, असे शेतकर्‍यांनी या आंदोलना दरम्यान सांगितले. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, चेअरमन नामदेव गोपाळघरे, शिवाजी भोसले, परमेश्वर होडशिळ, विजू क्षीरसागर, सुरेश सांळूके, शीतल भोसले, तुळशीदास गोपाळघरे व खर्डा पंचक्रोशीतील सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारच्या वतीने शासकीय दूध शीतकेंद्र सुरू करण्याची मागणी देखील या आंदोलना दरम्यान करण्यात आली.आंदोलनचे आयोजन चेअरमन नामदेव गोपाळघरे यांनी केले होते.