Sun, Aug 25, 2019 08:36होमपेज › Ahamadnagar › उत्खननस्थळी होणार कोम्बिंग ऑपरेशन

उत्खननस्थळी होणार कोम्बिंग ऑपरेशन

Published On: Jun 15 2018 1:03AM | Last Updated: Jun 15 2018 12:25AMनगर : प्रतिनिधी

जिल्हाभरात बेकायदा वाळूउपसा आणि वाहतूक मोठया प्रमाणात सुरु आहे. महसूल अधिकारी व कर्मचार्‍यांवर हल्‍ला करण्याचे प्रकार देखील सर्रास सुरु आहेत. वाळूतस्करांच्या या वाढत्या प्रकारला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कंबर कसली आहे. वाळूतस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी महसूल, पोलिस, आरटीओ आदी विभागांच्या संयुक्‍त पथकांव्दारे कारवाई केली जाणार आहे. वाळू उत्खननासाठी कुप्रसिद्ध असलेल्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन केलले जाणार आहे.

बेकायदा वाळूउपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यासाठी  जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्या अध्यक्षतेखाली काल (दि.14) नियोजन भवनात  महसूल, पोलिस व आरटीओ अधिकार्‍यांची बैठक झाली. यावेळी  जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, मनीष कलवानिया, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, मुख्य सरकारी वकील सतीश पाटील, मुख्य शासकीय संचालक विधी आनंद नरखेडकर, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर तसेच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी यांची उपस्थिती होती. 

यावेळी जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी बेकायदा वाळूतस्करीबाबत सर्वच अधिकार्‍यांकडून बारीक-सारीक घटनांची माहिती जाणून घेतली. महसूल पथकांनी वाळूतस्करांची पकडून आणलेली वाहने चोरीला जातात. वाळूतस्करांविरोधात गुन्हा नोंदविण्यासाठी पोलिस ठाण्यात विलंब होतो. अशा तक्रारी महसूल अधिकारी व कर्मचार्‍यांनी यावेळी केल्या. 

वाळूतस्करांवर मोक्का, एमपीडीए या कायद्यान्वये गुन्हे दाखल केले जावेत. या  गुन्ह्यात वारंवार सहभागी असणार्‍यांवर तडीपारीची कारण्यात यावी. वाळू तस्करीच्या घटनांत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करताना विलंब होणार नाही, याची दक्षता पोलिस विभागाने घ्यावी, अशा  सूचना जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी दिल्या. वाळू तस्करीच्या मुसक्या आवळण्यासाठी सर्वच यंत्रांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. 

वाळू उत्खननासाठी कुप्रसिद्ध असलेल्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून छापे टाकले जातील. संबंधित परिसरातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्‍तींकडून वाळू उत्खननास पाठबळ मिळते. अशा संशयित व्यक्‍तींवर  देखील कारवाई केली जाणार आहे. यासाठी  महसूल, पोलिस व आरटीओ आदी यंत्रणांचे संयुक्‍त पथके तयार केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.