Thu, Jan 17, 2019 16:23होमपेज › Ahamadnagar › भरतीबाबत एकतर्फी निर्णय देऊ नये

भरतीबाबत एकतर्फी निर्णय देऊ नये

Published On: Mar 06 2018 1:52AM | Last Updated: Mar 05 2018 11:06PMनगर : प्रतिनिधी

नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती प्रक्रिया विभागीय सहनिबंधकांनी रद्द केल्याने अन्याय झालेले विद्यार्थी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे सहायक जिल्हा उपनिबंधक हरीश कांबळे यांनी सहकार विभागातर्फे उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले. भरती प्रक्रियेबाबत न्यायालयात कुठलीही याचिका दाखल झाल्यास त्याबाबत आमची बाजू ऐकल्याशिवाय कुठलाही निर्णय न देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. भरती रद्द झाल्याने प्रामाणिकपणे अभ्यास करून परिक्षा उत्तीर्ण झालेल्या परिक्षार्थींवर यामुळे मोठा अन्याय झाला असून, शासनाने एकप्रकारे 400 जणांचे बळीच घेतल्याचा आरोप परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी केला आहे.

भरती रद्द झाल्याने अन्याय झाल्याची भावना निर्माण झालेले परिक्षार्थी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार आहेत. न्यायालयात याचिका दाखल झाल्यास न्यायालयातून भरती रद्दच्या आदेशास स्थगिती मिळू शकते. त्यामुळे वेळीच सावध झालेल्या सहकार विभागाईं कॅव्हेट दाखल करण्याचा निर्णय घेतला. कॅव्हेट दाखल करण्यासाठी विभागीय सहनिबंधकांनी सहायक जिल्हा उपनिबंधक हरीश कांबळे यांना प्राधिकृत केले होते. त्यानुसार कांबळे यांनी सोमवारी सकाळीच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत कॅव्हेट दाखल केले. परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केल्यास त्याचा निर्णय देतांना सहकार विभागाला म्हणणे मांडायची संधी देण्याची मागणी करण्यात आली आहे.