Tue, Jul 07, 2020 12:05होमपेज › Ahamadnagar › सरकारी शाळा बंद पाडण्याचा डाव?

सरकारी शाळा बंद पाडण्याचा डाव?

Published On: Dec 04 2017 1:39AM | Last Updated: Dec 03 2017 11:11PM

बुकमार्क करा

नगर : केदार भोपे

जिल्ह्यातील 49 प्राथमिक शाळा बंद केल्याने जिल्हा परिषदेचे पदाधिकारीही निर्णयावर नाराज आहेत. सरकारी शाळा बंद पाडण्याचा हा डाव असून, खाजगीकरणाला एकप्रकारे प्रोत्साहन देण्याचे धोरण तर सरकारने अंगिकारले नाही ना? असा सवाल विद्यार्थी संघटनांमधून उपस्थित होत आहे. याबाबत विद्यार्थी संघटना आक्रमक होणार असून, प्रशासनाला जाब विचारणार आहेत.

जिल्ह्यातील कमी पटसंख्या असलेल्या 49 प्राथमिक शाळा शिक्षण संचालनालयाच्या आदेशानंतर बंद करण्यात आल्या आहेत. या 49 शाळांनंतर कमी पटसंख्येच्या आणखी 40 शाळा शासनाच्या ‘रडार’वर असल्याचे कळते. राज्यातील पटसंख्या कमी असणार्‍या तसेच शैक्षणिक गुणवत्ता ढासाळलेल्या राज्यातील तेराशे प्राथमिक शाळा बंद करण्याचा इशारा राज्याच्या शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी नुकताच नगरमध्ये एका कार्यशाळेत दिला होता. त्यानंतर राज्यभरातील तेराशे शाळा बंद करण्याची कारवाई झाली. शिक्षण संचालनालयाच्या आदेशाने मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांनी शाळा बंद करण्याची कारवाई केली़. 

एकीकडे विद्यार्थ्यांच्या घरापासून जवळ शाळा असाव्यात म्हणून वस्तीशाळा सारख्या शाळांची निर्मिती करण्यात आली. मात्र त्यापैकी बहुतांश शाळा या निर्णयामुळे बंद होणार आहेत. सरकारी शाळांमध्ये शिकणारी बहुतांश मुले गरीब घरातील आहेत. अशा मुलांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. घरापासून जवळ असलेली शाळा आता अशा विद्यार्थ्यांच्या घरापासून लांब जाणार असल्याने शिक्षणाचा बट्ट्याबोळ होणार असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.