Sun, Aug 18, 2019 14:22होमपेज › Ahamadnagar › मराठा आरक्षणासाठी पाथर्डीत बंद

मराठा आरक्षणासाठी पाथर्डीत बंद

Published On: Jul 28 2018 1:31AM | Last Updated: Jul 27 2018 10:46PMपाथर्डी : शहर प्रतिनिधी

शासनाने मराठा समाजाची घोर फसवणूक केली असून, न्यायालयाला पुढे करत शासनाकडून समाजाची क्रुरचेष्टा सुरू आहे. आता आरक्षण मिळाल्या शिवाय मराठा स्वस्थ बसणार नाही. सर्व पातळ्यावर संघर्षासाठी सज्ज होण्याचे आवाहन करत सकल मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनाला विविध समाजांनी पाठिंबा देत शहर उत्स्फूर्त बंद ठेवले.
जुन्या बसस्थानक चौकात राष्ट्रीय महामार्गावर जाहीर सभा झाली. बेमुदत ठिय्या आंदोलनाची सुरुवात मोर्चाने झाली. शहरातील प्रमुख चौक व बाजारपेठेतून मोर्चा सभास्थळी आली. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी वातावरण तापवले. एसटी बसेस, सर्व शाळा, महाविद्यालये, प्राथमिक शाळा बंद ठेवण्याबाबत आंदोलकांनी आवाहन केले होते. त्यानुसार उत्स्फूर्त पाठिंबा देत निषेध सभा संपल्यानंतर बाजारपेठ उघडण्याचे आवाहन आंदोलकांनी केले.शंभर टक्के वाहतूक बंद असल्याने खासगी प्रवासी वाहतूकदारांनी चांगलेच हात धुऊन घेतले.

कोष्टी, मुस्लिम, वंजारी समाज, अ‍ॅड. प्रताप ढाकणे मित्र मंडळ आदींसह आरपीआय, मनसे, शिवसेना, भाजप आदी पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला. विविध समाजासह सर्वच घटकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दुसरीकडून वळवली होती. मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. साखळी पद्धतीने दररोज विविध गावांचे कार्यकर्ते ठिय्या आंदोलनात सहभागी होणार आहोत.