Sat, Feb 23, 2019 10:18होमपेज › Ahamadnagar › विद्यार्थी अंधारात अन् लोकप्रतिनिधी उजेडात! 

विद्यार्थी अंधारात अन् लोकप्रतिनिधी उजेडात! 

Published On: Feb 24 2018 1:15AM | Last Updated: Feb 23 2018 10:46PMखेड: वार्ताहर

खेड येथील गावठाण हद्दीत असलेले आणि गाव अंतर्गत वीजपुरवठा करणारे रोहित्र जळाल्याने संपूर्ण गाव अंधारात आहे. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात गावठाण हद्दीतील दोन रोहित्र जळाले होते.पुन्हा तेच रोहित्र जळाल्याने गावाला कंदिलांचा आधार घ्यावा लागत आहे.सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना अभ्यास कसा करावा? असा प्रश्‍न विद्यार्थ्यांना पडला आहे.

खेड गावाने गेली पंधरा वर्षे संघर्ष करून अखेर गावातच वीज उपकेंद्र कार्यान्वित केले. मात्र, खेडसह गणेशवाडी, शिंपोरा, औटेवाडी, वायसेवाडी, महादेवनगर, शिवशंभोनगर आदी भागाला खेडच्या वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. इतर गावांना वीज पुरवठा करणार्‍या खेडला सध्या पणत्या व कंदीलाचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या या रोहित्रांवर चोरटा वीज पुरवठा, शेती पंप, वॉटर हीटर, शेगड्या आदींचा अतिरिक्त भार असल्याने रोहित्र वारंवार जळत आहे. येथील विजेचा अतिरिक्त भार पाहता गावठाण हद्दीसाठी आणखी एका रोहित्राची आवश्यकता आहे.

या रोहित्रावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांची विविध दुकाने विजेविना बंद आहेत.त्यामुळे वीजबिले भरूनही या व्यवसायिकांचे मोठे नुकसान होत आहे.गावात सर्वत्र पथदिवे बसवण्यात आले आहेत, मात्र वीजच नसल्याने सर्वत्र अंधार पडत आहे. हे दिवे आता केवळ शोभेची वस्तू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

चिमणी पुन्हा निदर्शनास!

पूर्वी अनेक गावात वाड्यावस्त्यांवर वीज नसायची तेंव्हा या चिमणीचा दिवा म्हणून वापर केला जायचा. मद्याच्या मोकळ्या बाटल्यांमध्ये केरोसीन भरून वरील झाकणाला छिद्र पाडून वात लावली जायची. आज त्या चिमण्या पुन्हा घरोघरी दिसू लागल्या आहेत.