Wed, Jul 24, 2019 14:16होमपेज › Ahamadnagar › पारनेर तालुक्यात दुसर्‍या दिवशीही बंद 

पारनेर तालुक्यात दुसर्‍या दिवशीही बंद 

Published On: Jul 27 2018 1:24AM | Last Updated: Jul 27 2018 1:24AMपारनेर : प्रतिनिधी    

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या तालुका बंदच्या आवाहानास तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पारनेर शहर तसेच टाकळी ढोकेश्‍वर, सुपा, कान्हूरपठार, अळकुटी, जवळे आदी प्रमुख गावांसह खेड्यापाड्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. विशेष म्हणजे शाळा, महाविद्यालयांसह राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी बँका, पतसंस्थाही दिवसभर बंद होत्या. दरम्यान, समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज (दि.27) तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. 

निघोज, भाळवणी तसेच वडनेर बुद्रुक येथे बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला होता. उर्वरित तालुक्याने काल बंदमध्ये सहभाग नोंदविला. सकाळी 8 वाजता सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते बसस्थानक चौकात जमा झाले. बंदमध्ये सर्व व्यावसायीक सहभागी झाले. काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. आगोदरच नियोजन करण्यात आले असल्याने शहर तसेच परिसरातील नागरीक मोठया संख्येने बसस्थानक परिसरात जमा झाले होते. साधारणतः 9 वाजण्याच्या सुमारास रास्ता रोको आंदोलनास प्रारंभ झाला. 

विविध वक्त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आग्रही भूमिका मांडून सरकार या विषयावर निर्णय घेण्यास वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात  आला. राज्याच्या नोकरभतीमध्ये मराठा समाजासाठी 16 टक्के आरक्षण देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे. ही घोषणा फसवी असल्याचे नमुद करून शासनाने आरक्षणासंदर्भात प्रथम कायदा करावा, मगच आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पारनेर नगरपंचायतीची मासिक बैठकही शिंदे यांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात आल्याचे नगराध्यक्षा वर्षा नगरे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी सांगितले. आंदोलनास पाठिंबा देण्याचा ठराव नगरसेवक किसन गंधाडे यांनी मांडला, त्यास सर्व नगरसेवकांनी एकमुखी पाठींबा दर्शविला.

अळकुटी येथे सकाळी प्रभातफेरी काढण्यात येऊन निषेधसभा घेण्यात आली. शासकीय कार्यालयांबरोबरच शाळा तसेच महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली. सुपे येथे नगर-पुणे महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मुस्लिम समाजाच्या वतीने आंदोलनात सहभाग नोंदविण्यात येऊन मराठा आरक्षणास पाठिंबा जाहीर करण्यात आला. तालुका बंदच्या पार्श्‍वभूमीवर पारनेर आगराने सलग दुसर्‍या दिवशी एकही बस आगारातून बाहेर सोडली नाही. परिणामी तालुक्यातील प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. आजपासून आगारातील फेर्‍या नियमित सुरू करण्याचे नियोजन असल्याचे आगार प्रमुख पराग भोपळे यांनी सांगितले.