Mon, Jun 24, 2019 16:39होमपेज › Ahamadnagar › पालकमंत्री गप्प का?

पालकमंत्री गप्प का?

Published On: May 21 2018 1:08AM | Last Updated: May 20 2018 11:21PMनगर : मिठूलाल नवलाखा

जामखेड शहराला अनेक पिढ्यांपासून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी काम करणारे मागासवर्गीय सफाई कामगार यांना शासनाने महागाई भत्यापोटी दिलेल्या रक्कमेपैकी काही रक्कम या कर्मचार्‍यांची दिशाभूल करून हडप करण्यात आली. याबाबत संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात चर्चा सुरू असताना नगर परिषद  जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या ताब्यात असताना सदर प्रकरणी ना. शिंदे यांनी  घडलेल्या प्रकरणाबाबत  कुठलीही चौकशी  केली नाही. जामखेड पंचायत समितीतील सामान्य प्रशासन विभागातील कर्मचार्‍याने मयत निवृत्त पेन्शधारकांची जवळपास 40 लाख रक्कम हडप करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  मतदारसंघात एवढ्या मोठ्या घटना घडूनही पालकमंत्री अशा प्रकारांना पाठिशी घालत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. 

जामखेड नगरपरिषदेची स्थापना झाल्यानंतर नगर परिषदेचे 160 कर्मचारी नगर परिषदेकडे वर्ग करण्यात आले. या कर्मचार्‍यांच्या अनेक पिढ्यापासून म्हणजे ग्रामपंचायतपासून ते नगर परिषदेच्या स्थापनेपर्यंत कार्यरत आहेत. गेली अनेक वर्ष शहर स्वच्छ करून नागरिकांचे आरोग्य सांभाळण्याचे काम  तुंटपूज्या पगारावर अनेक वर्षांपासून कर्मचारी करत आहे. त्यानंतर नगर परिषद झाल्यावर त्यांच्या मेहनतीला यश आले आणि  त्याप्रमाणात त्यांचा पगार वाढला. त्यानंतर शासनाने या पगारातील फरक म्हणजे महागाई भत्ता प्रत्येक कर्मचार्‍याला 54,600 रुपये प्रमाणे देण्यात आला. हा फरक नगर परिषदेकडून मार्च अखेर त्यांच्या खात्यात वर्ग करणे आवश्यक होते. परंतु हा भत्ता 19 एप्रिल रोजी त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. ही मिळालेली रक्कम मोठी असल्याने नगर परिषदेमधील काही महाभागांनी नियोजनबद्ध पदधतीने या कर्मचार्‍यांना वेठीस धरून आलेले पैसे हे तुम्हाला पाहिजे असतील तर सदर सील्पवर सह्या करा असे म्हणून पहाटेच्या सुमारास काही लोकांच्या सह्या, काही लोकांचे अंगठे घेतले याबाबत वाचता करू नका, असा दमही भरला. 

दुसर्‍या दिवशी 20 एप्रिल रोजी सर्व कर्मचार्‍यांच्या खात्यात 54 हजार 600रुपये  जमा झाले. यापैकी 120 कर्मचार्‍यांच्या खात्यातून प्रत्येकी 6000 प्रमाणे 7 लाख 20 हजार तर 40 कर्मचार्‍यांच्या खात्यातून प्रत्येकी 15 हजाराप्रमाणे 6 लाख अशी एकूण 13 लाख 20 हजार एवढी रक्कम कर्मचार्‍यांच्या खात्यातून काढण्यात आली. ही गोष्ट कर्मचार्‍यांना मोबाईलवर आलेल्या मेसेजवरून समजली आणि कर्मचार्‍यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. 

या प्रकरणात बँकेमधून विडॉल स्लिप कोणी आणल्या व रक्कम काढण्यासाठी कोण गेले. बॅकेच्या मॅनेजरला रक्कम देण्यासदंर्भात कोणाचा फोन आला याचे  सर्व पुरावे  सीसीटीव्हीमध्ये दिसणार आहे. त्यामुळे यामध्ये सामील असणारे सर्वजण उघडे पडणार आहेत. यासंदर्भात मुख्याधिकारी विनायक औंदकर यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली असता याबाबत मला काहीच माहित नाही, असे म्हणून माझ्याकडे तक्रार आल्यानंतर मी चौकशी करेल, अशी उडवाउडवीचे उत्तरे दिली. यानंतर दोन दिवसांपूर्वी बँकेचे मॅनेजर यांना सीसीटीव्ही फुटेज मागणारे महाभाग कोण होते,  हे सर्व घटना आता चौकशीमध्ये बाहेर येणार आहे. त्यामुळे कोण चोर आणि साव हे बाहेर येणार आहे.  

एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचार्‍यांच्या रक्कममेध्ये अपहार होत असताना मुख्याधिकारी यांना कसे काय माहीत नाही. तसेच नगर परिषदेमधील पदाधिकारी यांना देखील काहीच माहीत नाही हे प्रश्‍न आता चौकशीनंतरच बाहेर येणार आहे. यासंदर्भात जामखेड येथील जिव्हाळा फौंडशन व कामगार संघटना यांनी आवाज उठवला आणि रितसर जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली. या तक्रारीची तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी राहूल त्रिवेदी यांनी  घेतली. या लेखी तक्रारीची दखल घेत कापडणीस यांनी यांची चौकशी करण्यासासाठी उपविभागीय अधिकारी कर्जत यांची नेमणूक करण्यात आली आणि नगर परिषदमध्ये एकच खळबळ उडाली.

हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न होत असताना दोन दिवसांपूर्वी झालेल्या मिंटीगमध्ये एका नगरसेवकाने यासंदर्भात कर्मचार्‍यांच्या बाजूने उभा राहण्यापेक्षा उलट कर्मचार्‍यांनाच दबबाजी करण्याचा प्रयत्न झाला. कर्मचार्‍यांनी आमच्याकडे न येता बाहेर जावून का प्रसिद्धी केली असा उलट प्रश्‍न सदर नगरसेवकाने केला. ज्या सर्वसामान्यांच्या जिवावर आपण नगर परिषदेमध्ये पदाधिकारी झालात त्यांच्या मागे न उभा राहता अधिकार्‍यांना पाठिशी घालण्याचे काम होत आहे. या प्रकरणाची आता वरिष्ठांमार्फत चौकशी होणार असल्याने यामध्ये सहभागी असलेले मास्टर माइंड उघडे पडणार आहेत. त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर येणार आहे. एवढी मोठी घटना घडत असताना भाजपाच्या ताब्यात असणारी नगर परिषदेवर पालकमंत्री यांचे वर्चस्व असताना ते शब्दही बोलण्यास तयार नाही, ही दुदैवी बाब आहे.