Sun, Oct 20, 2019 11:43होमपेज › Ahamadnagar › ‘त्या’ विभागप्रमुखाने आयुक्‍तांनाच सुनावले!

‘त्या’ विभागप्रमुखाने आयुक्‍तांनाच सुनावले!

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 10:30PMनगर : प्रतिनिधी

स्वच्छता सर्वेक्षणाच्या तयारीत पिछाडीवर असल्याने सुट्टीच्या दिवशी स्वतः आयुक्‍त मनपात येवून प्रयत्न करीत आहेत. स्वतःचे दालन सोडून सर्वेक्षण कक्षात ठाण मांडून कामे मार्गी लावत आहेत. मात्र, कामे मार्गी लावण्यासाठी आयुक्‍त प्रामाणिक प्रयत्न करीत असतांना अधिकार्‍यांची मुजोरी मात्र चांगलीच वाढली आहे. खुद्द आयुक्‍तांनाच मंगळवारी (दि.13) सायंकाळी या मुजोरीचा सामना करावा लागला. काम सांगितल्याच्या रागातून एका ‘नाठाळ’ विभागप्रमुखाने आयुक्‍तांना चांगलेच सुनावले. त्यानंतरही आयुक्‍त मवाळ भूमिकाच घेत असल्याने ‘आयएएस’ अधिकार्‍याची हतबलता मनपात चर्चेचा विषय ठरली आहे.

शुक्रवारी (दि.9) नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी घेतलेल्या बैठकीत कामे अपूर्ण असल्याने आयुक्‍तांना धारेवर धरण्यात आले होते. अ‍ॅप डाऊनलोडींगचे अपूर्ण टार्गेट, कागदपत्रांची पूर्तता न करणे, उपाययोजना न करणे, कचरा संकलन करतांना जागेवरच कचर्‍याचे विलगीकरण न करणे आदींमध्ये महापालिका पिछाडीवर आहे. सर्वेक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर या ‘घनकचरा’शी संबंधित कागदपत्रांची पूर्तता करणे, उपाययोजना करणे आवश्यक आहे. मनपाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांकडून पूर्तता होत नसल्याने त्यासाठी मुख्याधिकारी दर्जाचे अधिकारी शासनाने मदतीला दिले आहेत. सर्वेक्षणाचा विषय मुख्यमंत्र्यांनीच प्रतिष्ठेचा केलेला असल्याने ‘नगरविकास’कडून याबाबत वारंवार आढावा घेतला जात आहे. 26 फेब्रुवारीला सर्वेक्षणासाठी पथक येण्याची शक्यता असल्याने व त्यापूर्वी कामे मार्गी लावायची असल्याने आयुक्‍त स्वतः पाठपुरावा करत आहेत.

मंगळवारी सुट्टीच्या दिवशीही आयुक्‍त सर्वेक्षणाच्या तयारीसाठी मनपात येवून कामकाज करीत होते. स्वतःचे दालन सोडून स्वच्छ सर्वेक्षण कक्षात जाऊन त्यांनी  कागदपत्रांची पूर्तता, माहिती संकलनाच्या सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतला. उपस्थित कर्मचार्‍यांसह ‘त्या’ विभागप्रमुखालाही त्यांनी सूचना दिल्या. कामे वेळेत पूर्ण करावी लागणार असल्याने कामकाजाला गती द्या, असे त्यांनी विभागप्रमुखांना सांगितले. मात्र, त्या मुजोर विभागप्रमुखाने आयुक्‍तांना खडे बोल सुनावले. सगळे काम मीच करायचे का? तुमचे इतर अधिकारी काय करतात? असे सवाल करत आवाज चढवला. मुळातच सर्वेक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर या विभाग प्रमुखाचीच सर्वाधिक जबाबदारी आहे. बहुतांशी कामांचा कार्यभार त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे त्यांनी यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक असतांना इतरांकडे बोट दाखवण्या सुरुवात केली आहे.

स्वच्छ सर्वेक्षणासाठी शासनाकडून गांभीर्याने पाठपुरावा सुरु आहे. वारंवार बैठका घेवून आढावा घेतला जात आहे. मदतीसाठी कर्मचारी, अधिकारी पाठविले जात आहेत. त्यातूनही कामे मार्गी लागत नसल्याने आयुक्‍तांच वारंवार सचिवांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागप्रमुखा विरोधात आयुक्‍तांनी कठोर पवित्रा घेवून तात्काळ कारवाई करणे आवश्यक होते. मात्र, नेहमीप्रमाणे त्यांनी ‘मवाळ’ धोरण कायम ठेवल्याने आयएएस दर्जाचे अधिकारी असलेल्या आयुक्‍तांची ‘हतबलता’ मनपा वर्तुळातच चर्चेचा विषय ठरली आहे.