Wed, Apr 24, 2019 16:34होमपेज › Ahamadnagar › पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक वारसा जपत शहर झाले 528 वर्षांचे

पर्यटन नकाशावर झळकावे नगर..!

Published On: May 27 2018 1:16AM | Last Updated: May 26 2018 11:07PMपौराणिक, धार्मिक अन् मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नगर जिल्ह्यानं सहकाराची परंपरा फक्‍त राज्यातच नव्हे तर अवघ्या देशभरात रूजविली. मात्र, तत्कालीन काळातील सहकार क्षेत्रातील भरभराटीमुळं जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाकडं म्हणावं तसं फारसं लक्ष दिलं गेलंच नाही. साखर कारखाने अन् विविध सहकारी संस्थांवर वर्चस्व ठेवण्यात धन्यता मानत, प्रत्येक तालुक्यातल्या राज्यकर्त्यांनी आपापले राजकीय ‘गड’ सांभाळण्यातच धन्यता मानली. विकासाच्या माध्यमातून जिल्ह्याचे ‘नेते’ होण्याचा प्रयत्न कोणी केलाच नाही. जिल्ह्याचं ठिकाण असलेल्या नगर शहराची राज्यातील सर्व महत्त्वाच्या शहरांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख. या शहराच्या स्थापनेला 528 वर्षे पूर्ण होतायेत.

मात्र, तरीही विकासाच्या बाबतीत अन्य शहरांच्या तुलनेत नगर मात्र अजूनही मागेच पडलेलं आहे. सहकारची मुहूर्तमेढ जिथं रोवली गेली, त्या जिल्ह्याचं ठिकाण राजकीय नेतृत्वाच्या कूपमंडूक प्रवृत्तीमुळं विकासापासून वंचितच राहिलेलं आहे. विकासासाठी दूरदृष्टी असलेले आणि भविष्याचा वेध घेणारे खंबीर नेतृत्व मिळणं गरजेचं असतं. मात्र, त्याबाबतीत नगर शहराचं दुर्दैवच म्हणावं लागेल. जिल्ह्यातल्या नेतेमंडळींनी आपापल्या तालुक्यांपुरताच विचार करताना नगर शहराकडं नेहमीच कानाडोळा केला. पर्यायानं विकासाच्या बाबतीत शहराची पिछेहाटच होत गेली. आजमितीस शहराचा नुसता विस्तार वाढत गेला,

मात्र रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी तरूणवर्गाला कुटुंबाला येथेच सोडून मोठ्या शहरांचा रस्ता धरावा लागत आहे, हे दुर्दैवच म्हणावं लागेल. एमआयडीसीत असणारे अनेक मोठे उद्योग या ना त्या कारणानं दुसरीकडं गेले. नवीन उद्योग इथं यायला तयार नाहीत. एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठीही जागा उपलब्ध होत नाहीये. त्यामुळं औद्योगिक विकासाबाबत नेतेमंडळींनी प्रत्येक निवडणुकीत केलेल्या घोषणा नुसत्या ‘पोकळ’च ठरलेल्या आहेत. त्यामुळं आता रोजगाराच्या आणि उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करायच्या असतील, तर मोठी पौराणिक, धार्मिक अन् ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असलेल्या नगर शहरालाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला पर्यटनदृष्ट्या विकसित करणे हाच एकमेव पर्याय शिल्ले राहिलेला आहे.

एकेकाळी निजामशाहीची राजधानी असलेलं नगर शहर ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहेच. इतिहासातील अनेक लढाया जेथे लढल्या गेल्या, सुलताना चांदबिबीसारख्या सम्राज्ञीने जेथे राज्य करीत अकबरासारख्या बलाढ्य मुगल सम्राटाशी झुंज दिली, शहाजी राजांसह अनेक मराठा सरदारांनी जेथे आपल्या पराक्रमाने अनेक लढाया गाजविल्या, त्याचा साक्षीदार असलेला भुईकोट किल्ला राज्यकर्ते आणि सरकारी यंत्रणांच्या नाकर्तेपणामुळे सुशोभिकरणापासून अनेक वर्षे वंचित राहिला, हे नगरचे दुर्दैवच म्हणावे लागेल. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज सरकारविरूद्ध पुकारलेल्या ‘चले जाव’ चळवळीमुळे पंडित नेहरू, मौलाना अब्दुल कलाम, आचार्य नरेंद्र देव यांच्यासह तत्कालीन राष्ट्रीय नेत्यांना याच भुईकोट किल्ल्यात इंग्रजांकडून बंदीवान करण्यात आले होते.

देशाचे पहिले पंतप्रधान झालेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बंदीवान असतानाच या किल्ल्यातच ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’सारखा ग्रंथ लिहिला. या इतिहासाची भारतीयांनाच नव्हे तर परदेशी पर्यटकांना ओळख होण्यासाठी तो सर्वांसमोर येण्याची आवश्यकता आहे. या किल्ल्याच्या हस्तांतरणाबाबत मध्यंतरी लष्करी विभाग आणि राज्य शासनात सामंजस्य करार णाल्याचं सांगण्यात आल्यानं   पर्यटनदृष्ट्या विकासाची आशा पालवली होती. संयुक्‍त समितीद्वारे पाहणी करून विकासाचा आराखडा तयार केला जाणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. किल्ला लष्कराच्या ताब्यात राहणार असलातरी, तो नागरिकांना पाहण्यासाठी कायमस्वरूपी खुला केला जाणार असल्याचंही बोललं जात होतं. बंदीवान असताना पंडित नेहरू यांना इंग्रजांनी बागकाम दिले होते.

या पार्श्‍वभूमीवर यापूर्वीच्या सुशोभिकरण आराखड्यात किल्ल्यात नेहरू गार्डन विकसित केले जाणार होते. तसेच स्वातंत्र्य उद्यान, अ‍ॅम्पिथिएटर, मुगल गार्डनचाही त्यात समावेश होता. नवीन आराखड्यातही या गोष्टी समाविष्ट करण्याची आवश्यकता व्यक्‍त केली गेली होती. मात्र, पुढं या आराखड्याचं काय झालं, हे समजू शकलेलं नाही. त्यासाठी राजकीय इच्छाशक्‍ती दाखविणं गरजेचं आहे. याबरोबरच सलाबतखानाची कबर असलेली वास्तू चांदबिबी महाल परिसर आणखी विकसित केल्यास पर्यटनाचे खास आकर्षण ठरू शकतो. शहराचे संस्थापक असलेल्या अहमद निजामशहा यांची कबर असलेली बागरोजा ही वास्तू विकासापासून वंचित असून, तिथं जाण्यासाठी रस्ता नसावा, हेही दुर्दैवच म्हणावं लागेल. औरंगजेब या मुगल बादशहाने संपूर्ण देशावर सत्ता गाजविताना अखेरचा श्‍वास जिथं  घेतला, ते आलमगीर हे ठिकाणही शहराच्या अगदी जवळच आहे.

आग्रा येथील ताजमहाल उभारण्यासाठी ज्या ऐतिहसिक इमारतीपासून प्रेरणा घेतली गेली तो फराहबक्ष महाल हा तर वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या ऐतिहासिक स्थळाची डागडुजी लवकरच पुरातत्व विभागाकडून केली जाणार असल्याचं नुसतंच सांगण्यात येत आहे. मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, हा खरा प्रश्‍न आहे. शेजारीच असलेलं रणगाडा संग्रहालय पाहण्याजोगंच आहे.शिवाय नगरचं ऐतिहासिक वास्तू संग्रहालय हे तर इतिहासाचा चालताबोलता खजिनाच आहे. या ऐतिहासिक स्थळांच्या विकासाकडे लक्ष दिल्यास इतिहासाला उजाळा देणार्‍या या वास्तू पर्यटनाच्या दृष्टीने निश्‍चितच महत्त्वपूर्ण ठरतील अन् शहराच्या विकासातही भर घालतील यात शंका नाही. 

याशिवाय शहरासह जिल्ह्याला धार्मिक परंपरेचा तर फार मोठा वारसा आहे. विशाल गणेश मंदिर हे तर शहराचं ग्रामदैवतच आहे. केडगावची रेणूकामाता, बुर्‍हाणनगरची जगदंबा माता यांची मंदिरे तर नवरात्रोत्सवासह अखंड वर्षभर भक्‍तांचे प्रेरणास्त्रोतच. शहा शरीफ दर्गा हे हिंदू-मूस्लिम ऐक्याचे प्रतीक.शहरापासून जवळच भारतीयांसह परदेशी पर्यटक आणि भक्‍तांचं आकर्षण असलेलं मेहेरबाबांचं मेहेराबाद आहे. गोरक्षनाथांची मांजरसुबा येथील समाधी, पिंपळगाव माळवी येथील रामेश्‍वर मंदिर ही धार्मिक स्थळेही पर्यटनाच्या दृष्टीनं विकसित होऊ शकतात.

जिल्ह्यातील शिर्डी, शनिशिंगणापूर, मोहटादेवी, गोरक्षनाथ गड, मढी, मायंबा, वृद्धेश्‍वर, निघोजची मळगंगा देवी, ऐतिहासिक रांजणखळगे, अष्टविनायकांपैकी एक असलेलं सिद्धटेक, राशीनची जगदंबामाता, कोरठण खंडोबा, चोंडी येथील अहल्याबाई होळकर यांचे स्मारक, अशा कितीतरी धार्मिक स्थळांना जोडणारे नगर शहर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. पिंपळगाव माळवी येथील तलावासह सुमारे 700 एकरची जागा महापालिकेची आहे. या जागेवर आता महापालिकेचे नाव लागलेलं आहे. त्याठिकाणी अ‍ॅम्युझमेंट पार्क, वॉटरपार्कसारखा मोठा प्रकल्प खासगी विकसकामार्फत पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होऊ शकतो. त्यातून महापालिकेला उत्पन्नाचे मोठे साधनही उपलब्ध होऊ शकते. 

दरवर्षी पावसाचा अभाव आणि नद्या नसल्याने जिल्ह्याच्या दक्षिणेचा भाग नेहमीच दुष्काळप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचं ठिकाण असलेलं नगर शहर आणि परिसरही त्यास अपवाद नाही. प्राप्त परिस्थितीमध्ये शहराच्या औद्योगिक विकासासाठी फारशा संधी उपलब्ध राहिलेल्या नाहीत. नगरच्या औद्योगिक क्षेत्रातील परिस्थितीही त्यासाठी अनुकूल नसल्यानं नवीन उद्योग इथं  येण्यास तयार नाहीत. पुणे, रांजणगावनंतर आता सुपा एमआयडीसी विकसित होत आहे. तेथे जागा संपत नाहीत तोपर्यंत नगरकडं उद्योगांचं लक्ष जाणार नाही आणि त्यासाठी आणखी किती काळ लागेल हे सांगणं सध्या तरी अशक्यच आहे. त्यामुळे ऐतिहासिक आणि धार्मिक पार्श्‍वभूमीवर शहराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होण्यासाठीच आता ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने शहर आणि जिल्हा विकसित झाल्यास रोजगाराच्या संधीही आपोआपच उपलब्ध होऊ शकतात. पर्यटकांचा वावर वाढल्यास व्यापार, व्यवसायांनाही त्यामुळं भरभराटीचे दिवस येऊ शकतात. त्यासाठी शहराबरोबरच जिल्ह्यातील नेतेमंडळींनीही दूरदृष्टी दाखवून त्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार यांनीच त्यासाठी पुढाकार घेऊन केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या माध्यमातून आता पर्यटनाच्या दृष्टीने शहरासह जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील सर्वच नेतेमंडळीचा त्यास सकारात्मक हातभार लागला तर दुधात साखरच पडेल. महापालिकाही त्यासाठी मोठे माध्यम ठरणार असल्यानं शहराच्या लोकप्रतिनिधींसह महापौर व अन्य पदाधिकार्‍यांनीही त्यामध्ये विशेष लक्ष घालून शहराच्या विकासाला चालना देण्याची गरज आहे. शासकीय यंत्रणांनीही त्यादृष्टीने आवश्यक आराखडे तयार करून शहराच्या विकासात आपला सहभाग नोंदविण्याची गरज आहे. सर्वांच्या प्रयत्नाने नगर शहरासह जिल्हा लवकरच पर्यटनस्थळाच्या नकाशावर झळकावा, अशीच सर्वांची अपेक्षा आहे..!