Tue, Mar 19, 2019 15:34होमपेज › Ahamadnagar › ‘वर्ल्ड हेरिटेज सिटी’साठी ‘नगर’चा प्रस्ताव!

‘वर्ल्ड हेरिटेज सिटी’साठी ‘नगर’चा प्रस्ताव!

Published On: Jul 20 2018 1:10AM | Last Updated: Jul 19 2018 10:38PMनगर : मयूर मेहता

बिजापूर, बिदर, गुलबर्गा, गोलकोंडा या सारख्या शहरांप्रमाणेच नगर शहरालाही विशेष ऐतिहासिक वारसा आहे. या शहरांना ‘वर्ल्ड हेरिटेज सिटी’चा दर्जा मिळावा म्हणून नामांकन प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही सुरु असल्याकडे  प्रशासनाचे लक्ष वेधत दिल्लीगेट व माळीवाडा वेस पाडण्यास दिल्ली येथील वास्तूकला विद्यालयाच्या वास्तुशास्त्र संवर्धन विभागाने आक्षेप घेतला आहे. या विभागाच्या प्रमुख अनुराधा चतुर्वेदी यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पत्र पाठवून शहरातील ऐतिहासिक वास्तूंच्या विकासासाठी सहकार्य करण्याचीही तयारी दर्शविली आहे.

दिल्लीगेट ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान रस्ता रुंदीकरणात ऐतिहासिक दिल्लीगेट वेस पाडण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरु असल्याची चर्चा आहे. याला स्थानिक स्तरातून विरोध सुरु असतांनाच आता दिल्ली येथील योजना व वास्तूकला विद्यालयानेही वेस पाडण्यास आक्षेप नोंदविला आहे. तटबंदी असलेल्या काही शहरांपैकी एक असलेल्या नगर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. जानेवारी ते मे 2018 दरम्यान, विशेषतः फेब्रुवारी महिन्यात वास्तूकला विद्यालयाच्या वास्तुशास्त्र संवर्धन विभागाने नगर शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात दिल्लीगेट व माळीवाडा वेस या दोन्ही वेशींना प्रथम श्रेणीचा (ए1) वारसा असल्याचे पुढे आले आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या देशातील इतर शहरांप्रमाणेच नगर शहरालाही ऐतिहासिक वारसा आहे. त्या शहरांसह नगर शहराचे नावही ‘वर्ल्ड हेरिटेज सिटी’साठी नामांकित करण्याचा प्रस्ताव तयार केला जात असल्याचे त्यांनी पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले आहे.

माळीवाडा व दिल्लीगेट वेस या वास्तूंना ऐतिहासिक तसेच स्थापत्यद‍ृष्ट्या  मोठे महत्व आहे. 2011 मध्ये भारतीय पुरातत्व विभागानेही सदरच्या वेशी या 16 व्या शतकातील असल्याचे व या संरक्षित वास्तू नसल्या तरी शहराचा ऐतिहासिक वारसा असल्याने पाडण्यास परवानगी देता येणार नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे या दोन्ही वास्तू रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली पाडण्यात येवू नये, अशी विनंती करतांनाच योजना व वास्तूकला विद्यालय, वास्तुशास्त्र संवर्धन विभागाकडून या वास्तूंच्या विकासासाठी, संवर्धनासाठी व त्याच्या योग्य वापरासाठी स्थानिक प्रशासनास सहकार्य करण्याची तयारीही अनुराधा चतुर्वेदी यांनी दर्शविली आहे.

‘पुरातत्व’च्या आदेशाबाबत अधिकारी अनभिज्ञ?

दिल्लीगेट वेस पाडून रस्ता रुंदीकरण करण्याबाबत पुरातत्व विभागाने 40 वर्षांपूर्वीच (1977) मनाई केलेली आहे. 2011 मध्येही हा विषय पुढे आल्यानंतर मनपा उपायुक्‍तांच्या पत्रालाच उत्तर देवून पुरातत्वने कारवाईला परवानगी नाकारली होती. महापालिकेच्या दफ्तरी या पत्रांची नोंद असतांनाही दिल्लीगेट वेस पाडण्याची तयारी सुरु होऊन पोलिस बंदोबस्त मिळविण्यासाठी चर्चा होईपर्यंत या आदेशाबाबत अधिकारी अनभिज्ञ कसे? असा सवाल उपस्थित होत आहे.