Tue, Jan 22, 2019 01:46होमपेज › Ahamadnagar › नगर कुरिअर बॉम्बस्फोट प्रकरण; दहा दिवसांनंतरही ‘एटीएस’ला धागेदोरे मिळेनात

नगर कुरिअर बॉम्बस्फोट प्रकरण; दहा दिवसांनंतरही ‘एटीएस’ला धागेदोरे मिळेनात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

नगर बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपासासाठी दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) वरिष्ठ अधिकार्‍यांसह तपास पथक दहा दिवसांपासून नगरला तळ ठोकून आहे. परंतु, अजूनही तपास यंत्रणा ‘सीसीटीव्ही’ फूटेज पाहण्यातच व्यस्त आहे. अतिशय नियोजनबद्धरित्या केलेल्या या स्फोटाचे ठोस धागेदोरे अजून हाती लागलेले नाहीत, अशी माहिती सूत्रांकडून समजली.

माळीवाड्यातील कुरियर दुकानात झालेला स्फोट हा दहशतवादी कृत्याचा भाग असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याने दोन दिवसांतच हा स्फोट ‘एटीएस’कडे वर्ग करण्यात आला. स्फोट झाल्यापासूनच ‘एटीएस’चे पथक घटनास्थळी दाखल झाले होते व ते परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. सध्या गुन्ह्याचा तपास ‘एटीएस’कडून सुरू असला, तरी नगर पोलिसांचे पथकही मदतीला आहे. ‘आयबी’चे अधिकारीहीही दहशतवाद विरोधी पथकाला तपासात सहकार्य करीत आहेत. ‘मिलिटरी इंटिलेजियन्स’कडूनही माहिती घेतली जात आहे.

दहा दिवसांपासून अनेक जण तपासावर लक्ष केंद्रीत करून आहेत. मात्र, हा हल्ला नेमका कोणी केला, याबाबत कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत. तपास यंत्रणा अजूनही ‘सीसीटीव्ही’ फूटेज तपासण्यात व्यस्त आहे. माळीवाडा परिसरातील दुकाने व स्फोटात वापरलेल्या रेडिओ विक्रीची दुकाने यांचे सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहे. त्यात रेखाचित्राशी सार्धम्य असलेल्या व्यक्ती दिसते का, याची तपासणी केलेली जात आहे. या ‘सीसीटीव्ही’ फूटेजमधून तपास यंत्रणेच्या हाती अद्याप काहीही लागलेले नाही.

अजूनही तपास यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी त्यातच गुंतलेले आहेत. कोणतेही ठोस धागेदोरे अद्याप लागलेले नाहीत. वेगवेगळ्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. ‘एटीएस’चे पोलिस अधीक्षक स्फोटापासून नगरमध्ये तळ ठोकून आहेत. स्फोटामागे नेमकी कोणती शक्यता असू शकते, याची शक्यताही वर्तविणे कठीण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. अतिशय पद्धतशीरपणे, नियोजनबद्धरित्या केलेल्या या कृत्यामुळे तपास यंत्रणेच्या अडचणींत मोठी भर पडलेली आहे. कुरियर आणून देणार्‍याबाबतच ‘क्‍लू’ मिळालेला नसल्याने स्फोटाच्या मूळापर्यंत पोहोचण्याचा मार्ग खडतर झालेले आहे.

जखमींना सरकारी मदत नाहीच

माळीवाड्यातील स्फोट हा दहशतवादी कृत्याचा भाग आहे, असे प्रथमदर्शनी आढळून येत आहे. त्यामुळे सरकारकडून जखमी कामगाराला काहीतरी मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. ज्यांच्यासाठी हा रेडिओ पाठविला जाणार होता, त्या संजय नहार यांनीही सरकारवर नाराजी व्यक्त केलेली आहे. तरीही सरकारी यंत्रणेला अद्याप जाग आलेली नाही.

 

Tags : Ahmednagar, Ahmednagar news, City courier bomb explosion case, ATS, investigated,


  •