नगर : प्रतिनिधी
भिंगार नाल्यापाठोपाठ सीना नदी पात्राचीही गाळपेर जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसर्याला विक्री करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा संशय आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतर महसूल विभागाच्यावतीने प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. त्यातून अनेक बाबी उघड झाल्या आहेत, असे सूत्रांकडून समजले. याबाबत लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
सीना गदी पात्राचे अतिक्रमण काढण्याची मोहीम महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. ही मोहीम राबविताना अनेक बाबी उघडकीस आल्या. नदी पात्रातच अनेकांनी शेती करण्यास सुरुवात केली आहे. पात्रात अतिक्रमण करून त्यांचे व्यवसाय थाटले होते. महापालिकेचे विद्युत खांबही नदीपात्रात उभारण्यात आलेले आहे. नदी पात्र फक्त अतिक्रमणाच्याच विळख्यात नाही, तर तेथील गाळपेर जमीनही स्वतःच्या नावावर करून घेतली. त्याचे सातबारा उतारे तयार करणे, त्यानंतर बनावट दस्ताऐवज तयार करून त्याची विक्री करून अकृषिक करणे आदी गंभीर प्रकार करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याची शक्यता आहे. नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचे लक्षात येताच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी चौकशीचे आदेश दिले.
जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतर महसूल प्रशासनाने नदी पात्रातील गाळपेर जमीन व अतिक्रमणाबाबत सखोल चौकशी केली. या चौकशीत अनेकांनी गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले आहे, असे सूत्रांकडून समजले. हा अहवाल लवकरच जिल्हाधिकार्यांकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. भिंगार नाला येथेही गाळपेर जमीनीचे बनावट दस्ताऐवज तयार करून तिची विक्री केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात लोकायुक्तांच्या आदेशानंतर चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सीना नदी पात्र प्रकरणात जिल्हाधिकारी द्विवेदी यांनीच पुढाकार घेऊन चौकशीचे आदेश दिले होते. भिंगार नाला व सीना नदीतील अतिक्रमणाकडे महसूल प्रशासना विशेष लक्ष दिल्याने अनेकांची धाबे दणाणले आहेत.