Thu, May 23, 2019 04:52होमपेज › Ahamadnagar › छिंदम याच्या वक्तव्याने शिवप्रेमींत संतापाची लाट

छिंदम याच्या वक्तव्याने शिवप्रेमींत संतापाची लाट

Published On: Feb 19 2018 1:58AM | Last Updated: Feb 18 2018 11:15PMकर्जत : गणेश जेवरे

कर्जतसह तालुक्यामध्ये शिवजयंती उत्सव मोठया उत्साहात साजरा होत होता. यासाठी अनेक महिन्यांपासून सर्वजण परिश्रम घेत होते. संभाजी महाराजांचे महानाट्य, विविध स्पर्धा यामुळे तालुका शिवमय झाला असताना नगर येथील उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांचेबद्दल अपशब्द वापरून या सर्व आनंदी वातावरणामध्ये विरजण टाकण्याचे काम केले. त्यांच्या वक्तव्यानंतर तालुक्यात शांततेने सुरू असलेल्या या  सणाला  गालबोट लागले आहे. सर्व शिवप्रेमींच्या मनाला यातना झाल्या व त्या संतप्त भावनांना अनेक युवकांनी व्यक्तही केल्या.

मागील दोन वर्षांपासून येथील सकल मराठा समाजाचे अनेक बांधव व शहरातील सर्व समाजाचे नागरिक एकत्र येत  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांमधून साजरी करीत आहेत. येथे शिवजंयतीचे स्वरूप खूपच मोठे आणि भव्यदिव्य असे करण्यात आले आहे. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनावर आधरीत नरशार्दल संभाजी महाराज हे महानाट्य येथे तीन दिवस झाले. सुमारे 40 हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी हे महानाट्य पाहिले.  यानंतर राज्यातील अनेक नामवंत धावपटूच्या उपस्थितीमुळे येथील मॅरेथॉन स्पर्धा गाजत आहे.  या कार्यक्रमांमुळे शिवप्रेमींचा उत्साह ओसडूंन वाहत होता. असे असताना यामध्ये मिठाचा खडा पडला. उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती बद्दल अपशब्द वापरले. प्रत्येक जण याचा निषेध करीत होता. कर्जत शहर बदंची हाक देण्यात आली. अवघ्या एक तासामध्ये कर्जत शहर बंद झाले.  यानंतर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुक्यात मिरजगांव, माहीजळगांव, कुळधरण सर्व ठिकाणी बंद पाळण्यात आला. सर्व निषेध आंदोलन देखील अतिशय शांततेत झाले. 

कांबळे यांच्या पुरस्काराने तालुक्याचा सन्मान

कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांना पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा यावर्षीचा उत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार श्री कांबळे याना मिळाला असला तरी तो कर्जत तालुक्याचा सन्मान आहे. यापूर्वी याच महाविद्यालयास उत्कृष्ट महाविद्यालय हा पुरस्कार मिळाला होता.  

वधूच्या हवाईसफरची राज्यात चर्चा

मुस्लिम समाजामध्ये मुलीस लग्न झाल्यावर हेलिकॉप्टरने पाठविण्याची घटना फारच दुर्मिळ आहे.  मिजबा आणि मोहंमद अयाज यांचा विवाह धार्मिक पंरपरेनुसार झाला. कर्जतमधील दादा पाटील कॉलेजच्या पाठीमागील माळरानावर एक हेलिकॉप्टर थांबवले होते. मुलीच्या बिदाईची रस्म तिथेच झाली. नवरा, नवरी, नवरीचा भाऊ आणि एक पाठराखन असे चौघेजण हेलिकॉप्टरमध्ये बसले आणि नवरदेवाच्या गावी पाटोदाकडे गेले. कर्जत शहरामध्ये ही पहिलीच घटना घडली आहे. यामुळे हा सर्वत्र कौतुकाचा आणि चर्चेचा विषय झाला होता.