Sun, Jul 21, 2019 16:11
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › छिंदमच्या आक्षेपावर अभिप्राय नाही!

छिंदमच्या आक्षेपावर अभिप्राय नाही!

Published On: Jul 23 2018 1:06AM | Last Updated: Jul 22 2018 10:40PMनगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्यानंतर उपमहापौर पद गमावलेल्या नगरसेवक श्रीपाद छिंदमकडून राजीनामा दिलाच नसल्याचा दावा केल्यामुळे महापालिका प्रशासनही अडचणीत सापडले आहे. शासनाने मागविलेल्या अहवालावरही प्रशासनाने ‘बनावट सही’च्या आक्षेपावर ‘अभिप्राय देता येणार नाही’ असे म्हणत स्वतःची मान सोडविण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र आहे. छिंदमचा राजीनामा जाहीर करणार्‍या भाजपकडूनही यावर सपशेल मौन बाळगण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

16 फेब्रुवारी रोजी मनपा कर्मचार्‍याशी झालेल्या संवादावेळी छिंदमने छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्‍तव्यानंतर संपूर्ण राज्यात असंतोष पसरला होता. भाजपचा विद्यमान नगरसेवक व उपमहापौर पदावर असल्यामुळे या प्रकरणावरुन भाजप अडचणीत सापडल्यानंतर शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषद घेवून छिंदमची पक्षातून हकालपट्टी केल्याचे व उपमहापौर पदाचा राजीनामा घेतल्याचे जाहीर केले. दुसर्‍या दिवशीच 17 फेब्रुवारीला उपमहापौर पदाचे राजीनामा पत्र महापौर कार्यालयात दाखलही झाले. छिंदम विरोधात उमटलेल्या संतप्त भावना, शहरात निर्माण झालेला तणाव यामुळे महापौरांनीही या पत्रावर राजीनामा मंजूर करत पुढील कार्यवाहीसाठी ते प्रशासनाकडे सादर केले. तसेच मनपात विशेष महासभेचे आयोजन होऊन छिंदमचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव करण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने राजीनाम्यावर कार्यवाही करुन नवीन उपमहापौर निवडणुकीसाठी विभागीय आयुक्‍तांकडे प्रस्ताव सादर केला. त्यानंतर उपमहापौर निवडणूकही पार पडली.

दुसरीकडे शासनाकडे महासभेच्या ठरावावर कार्यवाही सुरु करत छिंदमला नोटीस बजावून म्हणणे मागविले होते. छिंदमने म्हणणे सादर करतांना उपमहापौर पदाचा राजीनामा दिलाच नसल्याचे व माझी बनावट सही करुन राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप महापौर व आयुक्‍तांवर केला होता. त्यावर शासनाने मनपा आयुक्‍तांकडून स्पष्ट अभिप्राय मागविला होता. आयुक्‍तांनी काही दिवसांपूर्वीच हा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. यात उपमहापौर पदाचा राजीनामा 17 फेब्रुवारील महापौर कार्यालयात दाखल झाल्याची नोंद असल्याचे व सदरचा राजीनामा महानगर जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, अहमदनगर या नावाने असल्याचे म्हटले आहे. लेटरहेडचा गैरवापर करुन व बनावट सही करुन राजीनामा तयार केल्याच्या व महापौर व आयुक्‍तांनी राजकीय षडयंत्र रचल्याच्या आक्षेपावर खुलासा मात्र करण्यात आलेला नाही. या आक्षेपावर अभिप्राय देता येणार नसल्याचे प्रशासनाने म्हटल्याचे सांगण्यात आले. छिंदमच्या आरोपानंतर शिवसेनेच्या वतीने माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी पलटवार करतांना सदरचा राजीनामा हा खा.गांधींकडून पाठविण्यात आल्याचे व याबाबत खा.गांधी यांनीच खुलासा करण्याचे आव्हान दिले होते. याबाबत अद्यापही त्यांच्याकडून अथवा भाजपाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

..तर भाजप अडचणीत येण्याची शक्यता!

श्रीपाद छिंदमने बनावट सही करुन राजीनामा तयार केल्याची व राजकीय करिअर संपविण्याचा डाव रचल्याची तक्रार तोफखाना पोलिस ठाण्यात केली आहे. महापौर व आयुक्‍तांवर यात आक्षेप असून याबाबत पोलिसांकडून तपास सुरु झाला आहे. ‘बनावट सही’बाबत तज्ज्ञांकडून तपासणी अहवाल मागविण्यात येणार आहे. छिंदमची सही बनावट आढळल्यास महापौर, आयुक्‍तांपेक्षा राजीनामा घेतल्याचे जाहीर करणारी भारतीय जनता पार्टीच अधिक अडचणीत येण्याची शक्यता आहे.