Wed, Jan 23, 2019 23:17होमपेज › Ahamadnagar › नगराध्यक्षांची मुख्याधिकार्‍यांना शिवीगाळ

नगराध्यक्षांची मुख्याधिकार्‍यांना शिवीगाळ

Published On: Mar 15 2018 1:17AM | Last Updated: Mar 15 2018 12:11AMश्रीरामपूर : प्रतिनिधी

देवळाली पालिकेच्या नगराध्यक्षांनी सफाई कामगारांच्या फरकाची रक्कम काढण्यावरून तेथील मुख्याधिकार्‍यांंना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून हात उगारल्याची संतापजनक घटना काल सकाळी घडली. दरम्यान, याप्रकरणी संबंधित सीओ’ने पोलिसात धाव घेतल्याचे समजते.

याचे झाले असे की, भाजपाच्या ताब्यात असलेल्या देवळाली प्रवरा नगरपालिकेतील 12 सफाई कामगारांनी फरक मिळण्याबाबत लेखी अर्ज केला होता. याप्रकरणी वरिष्ठांचे निर्देश मिळाल्यानंतर मुख्याधिकार्‍यांनी अकौटंटमार्फत तसे बील तयार करून ते नगराध्यक्षांकडे सहीसाठी पाठवले होते. मात्र, त्यावर सही करण्याऐवजी नगराध्यक्षांनी मुख्याधिकार्‍यांना आपल्या केबिनमध्ये बोलावून घेत या कामगारांची बिले कशी काय काढलीस, असे म्हणून अरेरावी व शिवीगाळ केली. यामुळे संतापलेल्या सीओंनी देखील मी प्रशासकीय अधिकारी आहे, शिव्या देऊ नका, नीट बोला, असे समजावले. त्यावर नगराध्यक्षांचा राग अनावर होऊन टेबलवरील पाण्याची बाटली उचलून मारण्याचा प्रयत्न केला, तसेच शेजारील खुर्ची उचलून उद्या तू गावात दिसता कामा नये, अशी धमकीही दिली. 

केबिनमध्ये हा गोंधळ उडाल्याचे पाहून काही नगरसेवक व कर्मचार्‍यांनी मध्यस्थी करीत मुख्याधिकार्‍यांना बाहेर नेले. त्यानंतर मुख्याधिकार्‍यांनी याबाबत बीट हवालदार यांच्याशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. तसेच ते फिर्याद देऊन पोलिस संरक्षणाची मागणी करणार असल्याचे त्यावेळी बोलले जात होते. 

दरम्यान, संबंधित नगराध्यक्ष नेहमीच वेगवेगळ्या कारणावरून यापूर्वीही चर्चेत आलेले आहेत. त्यांना पक्षाकडूनही अभय मिळत असल्याने त्यांची प्रशासकीय अधिकार्‍याला दमदाटी करण्यापासून धावून जाण्यापर्यंत मजल  गेली आहे. या प्रकारामुळे देवळाली शहरातून दिवसभर संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. तसेच पालिकेचे अधिकारी व कर्मचार्‍यांनीही स्थानिक राजकीय दबाव झुगारून काम बंद आंदोलन करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती.  त्यामुळे भविष्यात हे प्रकरण चांगलेच चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.