होमपेज › Ahamadnagar › प्लॅस्टिक बंदीबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे

प्लॅस्टिक बंदीबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे

Published On: Jul 01 2018 1:51AM | Last Updated: Jun 30 2018 10:46PMनगर : प्रतिनिधी

 शासनाच्या प्लॅस्टिक बंदी निर्णयाबाबत शहरातील व्यापार्‍यांनी खा. दिलीप गांधी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन व जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई यांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.

प्लॅस्टिक बंदी संदर्भात व्यापार्‍यांनी खा.गांधी यांच्याकडे अडचणी मांडल्या. या प्रसंगी प्लॅस्टिक उत्पादक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश गांधी, भाजप युवा मोर्चा व्यापारी आघाडी प्रमुख अविनाश साखला, जयदेव चंदे, अमृत मुथियान सत्यजित खतोड, वसंत लुणीया, दिलीप लुकंड, रमेश लुकंड, अमोल पोखर्णा, सतीश सोमाणी, संजय राटकर आदी उपस्थित होते. 

निवेदनात म्हटले आहे की, प्लॅस्टिक कॅरीबॅग बंदीला सर्व कारखानदार, व्यापारी वर्ग व ग्राहक या सर्वांचा पाठिंबा आहे. मात्र, त्यासाठी 2006 च्या कायद्यानुसार पिशवीची जाडी 50 मायक्रॉनपेक्षा अधिक ठेवावी. चेन लॉक व झिप लॉक बॅगेची जाडी 75 मायक्रॉन ठेवल्यास, ती बॅग अनेकवेळा वापरण्यात येईल व प्लॅस्टिक प्रदूषण कमी होईल. किराणा माल, फरसाण, बेकरी उत्पादने, पापड, शेंगदाणे, फुटाणे, मुरमुरे, चहा आदी किराणा सामानाच्या पॅकिंगसाठी 50 मायक्रॉनची पिशवी व त्यावरील प्रिंटींग करण्यास कारखानदार तयार असून, त्यास परवानगी द्यावी. प्लॅस्टिक बंदीमुळे कारखाने बंद करावे लागल्यास, त्यांचे कर्ज व आर्थिक नुकसान भरपाई सरकारने करावी.  शेतकर्‍यांप्रमाणे कर्जमाफी करावी. तसेच त्या उद्योजकांना नवीन उद्योगासाठी सवलतीच्या दराने कर्ज द्यावे. जीएसटीमध्ये सवलत द्यावी.

देशातून आलेल्या प्लॅस्टिक पॅकिंगवर चिन्ह व रिसायकल चिन्ह नसेल तर दंडात्मक कारवाई करु नये. प्लॅस्टिक वेस्ट कलेक्शन सेंटर खोलण्यासाठी ग्रामपंचायत, महापालिका, नगरपंचायत यांच्याकडून जागेचे नियोजन करून द्यावे. प्लॅस्टिक रिसायकलिंग युनिटसाठी सवलतीने कर्जपुरवठा व टॅक्स माफी द्यावी. जेणे करून नवीन उद्योजक यामध्ये येतील व खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. प्लॅस्टिक वेस्ट रिसायकलिंगसाठी कॉर्पोरेशन व उद्योजक यांच्यामध्ये समन्वय साधावा. या मुद्यांचा विचार केल्यास प्लॅस्टिक बंदी सुसह्य होऊन, प्लॅस्टिक प्रदूषण कमी होईल.