Tue, Jul 23, 2019 02:08होमपेज › Ahamadnagar › ‘त्या’ दोघांच्या मृत्यूला मुख्यमंत्रीच जबाबदार! : संभाजी ब्रिगेड

‘त्या’ दोघांच्या मृत्यूला मुख्यमंत्रीच जबाबदार! : संभाजी ब्रिगेड

Published On: Jul 26 2018 1:30AM | Last Updated: Jul 26 2018 1:30AMनगर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाचा लढा गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे. लाखो समाज बांधव मूक मोर्चाच्या माध्यमातून उतरले. त्यांनी जसा इतिहास घडवला तसाच इतिहास सरकारने पदरात काहीच न टाकल्यामुळे घडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालिश वक्तव्यामुळेच हे आंदोलन चिघळले आहे. यात बळी गेलेल्या दोघांच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कारवाई करावी. तसेच मराठा आरक्षणाला समर्थन असलेल्या आमदार, खासदारांनी राजीनामे देवून आंदोलनात सहभागी व्हावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. दरम्यान, सरकारने निर्णय न घेतल्यास 1 ऑगस्टपासून राज्यभरात आंदोलनाचा भडका होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मनोज आखरे यांनी नगर येथे पत्रकारांशी संवाद साधून भूमिका मांडली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बालीश पणाचे विधाने करत आहेत. पंढरपूर येथे शासकीय पूजेसाठी येतांना आरक्षणाचा निर्णय घेवून यावा, अशी मागणी आम्ही केली होती. मात्र, त्यांनी काही संघटना वारीमध्ये साप सोडणार आहेत, असा  गोपनीय अहवाल प्राप्त झाला असल्याचे वक्‍तव्य केले. 

अहवाल गोपनीय होता तर तो जाहीर का केला? हा अहवाल कोणत्या अधिकार्‍याने दिला, तेही जाहीर करावे. शासनाच्या गोपनीयतेचा भंग महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मराठा समाजाला संत विचारांची परंपरा आहे. असे साप सोडण्याचे विकृत विचार मराठा बांधवांच्या मनातही येत नाही. याउलट संघाचेच समर्थक असलेले समाजकंटक पंढरपुरात दाखल झाले होते, अशी मागणी आम्हाला मिळाली. त्यामुळे आम्ही संभाजी ब्रिगेडची 22 पथके दाखल केली. त्यामुळे अनर्थ टळला, असा दावा त्यांनी केला.

आज मराठा आंदोलन वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेले आहे. दोन जणांनी आपला जीव गमावला. उद्या जर मराठ्यांनी आमदार, खासदारांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला, त्यांना रोखणार कसे? असा प्रश्‍न आमच्यापुढे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाली काढावा. आरक्षणाच्या मागणीला समर्थन असलेल्या आमदार, खासदारांनी राजीनामे द्यावेत व आंदोलनात सहभागी व्हावे. आंदोलनात बळी गेलेल्या समाजबांधवांना हुतात्मा जाहीर करावे. त्यांच्या कुटुंबातील एकास शासकीय नोकरी द्यावी व 1 कोटींची मदत द्यावी, अशी मागणीही आखरे यांनी केली. पत्रकार परिषदेस कोषाध्यक्ष संतोष गाजरे, संभाजी ब्रिगेडचे नेते राजेश परकाळे,  जिल्हाध्यक्ष टिळक भोस, पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, दिलीप वाळुंज, राजेंद्र राऊत, युवराज चिखलठाणे, गणेश गायकवाड आदी उपस्थित होते.