होमपेज › Ahamadnagar › मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनी राजीनामे द्यावेत : पिचड

मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनी राजीनामे द्यावेत : पिचड

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 07 2018 10:43PMजामखेड : प्रतिनिधी 

राज्यात संपूर्णपणे कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. दिवसाढवळ्या गोळीबार होत आहे. यामध्ये अनेकांचे बळी जात आहेत. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी राजीनामा द्यावा. राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असावा, असे मत योगेश व राकेश यांच्या दशक्रियाविधीनंतर पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्‍त केले. 

यावेळी प्रदेश संघटक राजेंद्र कोठारी, मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, बाळासाहेब शिंदे, सोमनाथ धूत, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार आदी उपस्थित होते. पिचड म्हणाले, शांतता व संयमी जामखेड सारख्या तालुक्यात गोळीबारांच्या घटना घडत आहेत. ही बाब अतिशय निंदनीय आहे. त्यामुळे यांचा परिणाम जामखेडच्या बाजारपेठेवर होत आहे. घडलेली घटना ही राळेभात कुटुंबीयावर नसून, तो राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेला हल्ला आहे. 

तालुक्यामध्ये राजकीय नेते राजकारणासाठी गुंडांचा आश्रय घेतात. ही खेदाची बाब आहे. आम्हीही राजकरण करतो. परंतु अशा खालच्या पातळीवर जाऊन करत नाही. तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, दहशत, वाळू तस्करी, गावठी कट्टे, या माध्यमातून टोळी युद्ध सुरू आहे. याला  सर्वस्वी जबाबदार  पालकमंत्री राम शिंदे आहेत. नगरमध्ये घटना घडल्यानंतर पक्षपातीपणे आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जातात. 

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे कमी केले जातात. ही बाब चुकीची आहे. त्यामुळे जिल्ह्यातील व राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे. कोणीही सुरक्षित नाही. यासंदर्भात मी स्वतः विरोधी पक्षनेते धनजंय मुंढे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभेत आवाज उठविण्यास सांगणार आहे, असे पिचड म्हणाले.