Thu, Jul 18, 2019 12:44होमपेज › Ahamadnagar › मनपाचे मुख्य लेखाधिकारी अखेर निलंबित!

मनपाचे मुख्य लेखाधिकारी अखेर निलंबित!

Published On: Apr 06 2018 1:30AM | Last Updated: Apr 05 2018 11:42PMनगर : प्रतिनिधी

महापालिकेतील बहुचर्चित पथदिवे घोटाळा प्रकरणाच्या चौकशी अहवालात ठपका असलेले मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप झिरपे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वित्त विभागाने तब्बल महिनाभरानंतर ही कारवाई केली असून, 31 मार्च रोजी बजावण्यात आलेला आदेशही 6 दिवसांनंतर समोर आला आहे. 

मुख्य लेखाधिकारी झिरपे यांना पथदिवे घोटाळा प्रकरणात 8 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्या दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात कारवाईचे आश्‍वासन दिले होते. झिरपे हे 48 तासांपेक्षा अधिक काळ कोठडीत असल्याने त्यांचे निलंबन निश्‍चित होते. मात्र, याबाबतचे आदेशच न आल्यामुळे मनपा आयुक्‍तांनी त्यांना कामावर रुजू करुन घेतले होते. गुरुवारी नगरविकास विभागाने महापालिकेला पत्र पाठवून झिरपे यांच्या विभागीय चौकशीसाठी दोषारोप पत्राबाबत माहिती मागविली आहे. यात 8 मार्चपासूनच झिरपे यांचे निलंबन करण्यात आल्याचा व तसा आदेश 31 मार्च रोजीच वित्त विभागाने दिलेला असल्याचे म्हटले आहे. 

महापालिकेत गुरुवारी नगरविकास विभागाचे पत्र आल्यानंतर हे समोर आले असून, कालपर्यंत आदेश का बजावण्यात आला नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, पथदिवे घोटाळा प्रकरणात यापूर्वी प्रभारी उपायुक्‍त विक्रम दराडे, मनपाचे उपशहर अभियंता रोहिदास सातपुते, पर्यवेक्षक बाळासाहेब सावळे व लिपिक भरत काळे यांना निलंबित केले आहे.

Tags : nagar, nagar news, Chief Accounting Officer, finally suspended,