Fri, Jul 19, 2019 05:04होमपेज › Ahamadnagar › गावठाणसाठी कमी किंमतीत जागा देऊ

गावठाणसाठी कमी किंमतीत जागा देऊ

Published On: Feb 08 2018 1:42AM | Last Updated: Feb 07 2018 11:18PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

श्रीरामपूर तालुक्यातील शेती महामंडळ लगतच्या जागा गावठाणासाठी अत्यल्प किंमतीत उपलब्ध करुन देऊ, असे आश्‍वासन महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले.

श्रीरामपूर तालुक्यातील अनेक प्रश्‍नांसाठी काल तालुक्यातील विविध शिष्टमंडळांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ना. पाटील यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत ना. विखे व आ. कांबळे यांनी विविध मागण्या केल्या. आ. कांबळे यांनी श्रीरामपूर तालुक्यातील शेती महामंडळाच्या जमिन वाटपातील प्रलंबित विविध प्रश्‍नावर चर्चा केली. श्रीरामपूर तालुक्यातील शेती महामंडळाच्या लगतच्या गावांना गावठाण विस्तार व इतर सामाजिक प्रयोजनासाठी विना मोबदला जमिन देण्याची मागणी आ. कांबळे यांनी केली. यावर ना. पाटील यांनी सांगितले की, सामाजिक प्रयोजनासाठी लागणार्‍या जमिनीसाठी पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवावेत. सदरची जमिन ही विना मोबदला देता येणार नाही. परंतु त्यांना अत्यल्प दरात जमीन उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले.

आ. कांबळे यांनी शेती महामंडळाने जलसंधारण कामासाठी विना मोबदला देण्याची मागणी केली. सदरची जमिन मिळाल्यास तालुक्यातील तलाव व बंधार्‍यांची कामे होण्यास मदत होवून तालुका समृद्ध होईल अशी मागणी केली. यावर ना. पाटील यांनी जलसंधारणाच्या कामाबाबत फेरसर्व्हे करून जमिनी वाटपात शिल्लक जमिनीवर बंधारे बांधण्यासाठी जमिन उपलब्ध असल्याबाबत खात्री करण्याचे आदेश दिले. पाझर तलावाकाठी जमिन उपलब्ध असल्यास ती देण्यात येईल असे सांगितले. 

शेती महामंडळाच्या वाड्या वस्त्यावरील राहणार्‍या कर्मचारी व नागरिकांना लगतच्या गावातील जमीन उपलब्ध करुन द्यावी. तसेच महामंडळाच्या जागेवर काम करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र द्यावे जेणेकरुन या नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यात येईल, अशी मागणी कांबळेंनी केली. यावर ना. विखे यांनी प्रत्येकी कुटूंबास दोन गुंठे जागा उपलब्ध करुन द्यावी अशी सुचना केली. यावर ना. पाटील यांनी रेडीरेकनर प्रमाणे प्रत्येक कुटुंबाला दोन गुंठे जागा देण्याचे मान्य केले. 

याप्रसंगी आकारीपडीत जमिनीबाबत चर्चा झाली. परंतु याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. यावेळी पंचायत समितीचे सभापती दीपकराव पटारे, जि.प. सदस्य शरद नवले यांनी आपले प्रश्‍न मांडले.
बैठकीला साईबाबा संस्थानचे विश्‍वस्त प्रताप भोसले, पं.स.चे उपसभापती बाळासाहेब तोरणे, खंडकरी नेते अण्णासाहेब पाटील, गिरीधर आसने, दिलीप मुठे आदी उपस्थित होते.