Sat, Nov 17, 2018 00:28होमपेज › Ahamadnagar › प्रसुतीआधीच दिला बाळाला जन्म!

प्रसुतीआधीच दिला बाळाला जन्म!

Published On: Jul 08 2018 1:42AM | Last Updated: Jul 07 2018 11:27PMनगर : प्रतिनिधी

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 13 सप्टेंबर 2011 रोजी प्रसुती झालेल्या महिलेच्या बाळाचा तीन दिवस अगोरच जन्म झाल्याचा दाखला देण्याचा प्रताप महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. तसेच बाळाचे नावही परस्पर बदलले आहे. या प्रकाराने आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.

याबाबत माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील एक महिला 13 सप्टेंबर 2011 रोजी रात्री 7 वाजून 40 मिनिटांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे प्रसुत झाली. तसे सिव्हिल हॉस्पिटलने दिलेल्या जन्म अहवालात नमूद आहे. त्या बाळाच्या पित्याने जन्मदाखल्यासाठी महापालिकेत अर्ज केला होता. त्यावर आरोग्य विभागाने त्या बाळाचा जन्म 10 सप्टेंबर 2011 रोजी झाल्याचे जन्म प्रमाणपत्र संबंधित अर्जदारास दिले आहे. तसेच अर्जात दिलेले बाळाचे नाव व प्रत्यक्षात दाखल्यावरील नाव भिन्न आहे. ही चूक लक्षात आल्यानंतर कोणीतरी अर्जातील जन्मतारखेत खाडाखोड केल्याचेही स्पष्टपणे दिसून येत आहे. दोन चुका दुरुस्त करण्यासाठी तिसरी चूक करण्याचा ‘उद्योग’ही संबंधित विभागातील अधिकारी अथवा कर्मचार्‍याने केलेला आहे.

या प्रकारातून महापालिकेच्या आरोग्य विभागात किती अनागोंदी कारभार सुरू आहे, हे उघड होते. अशा पद्धतीचे आरोग्य विभागात गंभीर स्वरुपाचे अनेक गैरप्रकार होत असल्याची चर्चा आहे. महिलेची प्रसुती होण्याअगोदरच बाळाला जन्म देण्याचा प्रताप करणार्‍या या विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

सखोल चौकशी करण्याची आवश्यकता

जन्मतारखेत फेरफार करण्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी अथवा कर्मचार्‍याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. सखोल चौकशीतून या विभागातील अनेक गैरप्रकार उघडकीस येऊ शकतात, अशी चर्चा आहे. प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या प्रकरणात लक्ष घालून कारवाई संबंधिताविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.