Fri, Jul 19, 2019 19:49होमपेज › Ahamadnagar › मनपाच्या घरकुल योजनेला केंद्राची मंजुरी!

मनपाच्या घरकुल योजनेला केंद्राची मंजुरी!

Published On: Apr 28 2018 1:41AM | Last Updated: Apr 28 2018 1:32AMनगर : प्रतिनिधी

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत केडगाव व नालेगाव येथे प्रस्तावित असलेला महापालिकेचा 840 घरकुलांचा प्रकल्प केंद्र शासनाच्या समितीने मंजूर केला आहे. राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत अहवाल मंजूर झाल्यानंतर काल (दि.27) नवीदिल्ली येथील केंद्रीय मान्यता व नियंत्रण समितीने 65.79 कोटींच्या या योजनेस अंतिम मंजुरी दिली आहे. दरम्यान, शासनाच्या आदेशानंतर मनपाकडे प्राप्त अर्जांमधून 840 लाभार्थ्यांची या योजनेसाठी सोडत काढण्यात येणार आहे.

केंद्र सरकारमार्फत राबविल्या जात असलेल्या पंतप्रधान आवास योजनेत भागीदारी तत्वावर परवडणारी घरे, वैयक्‍तिक मालकीच्या जागांवर घरकूल उभारणी व झोपडपट्टी पुनर्वसन अशा तीन घटकांच्या माध्यमातून मनपाने प्रस्ताव केले आहेत. त्यातील भागीदारी तत्वावर परवडणार्‍या घरांसाठी मनपाकडे 8900 अर्ज दाखल झाले आहेत. मनपाने केडगाव नालेगाव येथे घरकूल बांधणीसाठी प्रकल्प अहवाल सादर केला होता. म्हाडाच्या तपासणीनंतर मनपाच्या दोनही अहवालाला राज्यस्तरीय समितीने 17 एप्रिलला मंजुरी दिली होती. त्यानंतर केंद्रीय समितीकडे अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. केडगाव येथे 624 घरकुलांचा प्रकल्प प्रस्तावित असून त्यासाठी 46.32 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तर  नालेगाव येथे 216 घरकुले बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी 19.47 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. कालच्या बैठकीत एकूण 65.79 कोटींचा खर्च असलेली 840 घरकुलांची योजना समितीने मंजूर केली आहे.

समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार मनपाकडे प्राप्त असलेल्या अर्जांमधून लाभार्थ्यांची सोडत काढण्यात येणार आहे. सोडत झाल्यानंतर लाभार्थ्यांची नावे शासनाकडे पाठविण्यात येतील. त्यानंतर शासनाकडून अडीच लाख रुपये प्रति लाभार्थी यानुसार अनुदान दिले जाणार आहे. केडगाव येथील एका घरकुलासाठी सुमारे 7 लाखांचा खर्च अपेक्षित असून लाभार्थ्यांना 4.5 लाखांत घर मिळणार आहे. तर नालेगाव येथील एका घरकुलासाठी 9 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. त्यात अडीच लाखांचे अनुदान वगळता साडेसहा लाख रुपयांत लाभार्थ्यांना घरकुल मिळणार आहे. केंद्र शासनाने या योजनेला अंतिम मंजुरी दिल्यामुळे सर्व सामान्यांसाठी नवा प्रकल्प उभारण्याचा मनपाचा मार्ग मोकळा झाला आहे.