Wed, Jul 17, 2019 18:07होमपेज › Ahamadnagar › अडबंगनाथ संस्थान नावारुपास : ना. विखे

अडबंगनाथ संस्थान नावारुपास : ना. विखे

Published On: Jan 21 2018 2:43AM | Last Updated: Jan 20 2018 11:53PMमाळवाडगाव : वार्ताहर

आपणा सर्वांचे श्रद्धास्थान सद‍्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या कृपाआशिर्वादाने या धर्मनाथ बीज सोहळ्याची परंपरा अन् जबाबदारी अरुणनाथगिरी महाराज समर्थपणे सांभाळत असल्याने अडबंगनाथ देवस्थान नावारुपास आले असल्याचे गौरवोद‍्गार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी काढले.

श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान येथे धर्मनाथ बीज सांगता सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण शिवारातील श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान येथे सालाबादप्रमाणे या पंधराव्या वर्षीचा धर्मनाथ बीज सोहळा हजारो भाविकांच्या मांदियाळीत संपन्न झाला. काल सकाळी 10 वाजता संस्थानचे मठाधिपती अरुणनाथगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता झाली. यावेळी देवस्थानवर ना. विखे यांचे आगमन झाले. अडबंगनाथ मंदिरातील शिळेवर त्यांनी पूजा करून दर्शन घेतले. 

ना. विखे म्हणाले की, गोदावरी काठावर नगर जिल्ह्यात कोपरगाव पुणतांब्यापासून, तर श्रीक्षेत्र नेवासा मढीपर्यंत संतांची भूमी आहे. आपणा सर्वांचे श्रद्धास्थान सद‍्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने याठिकाणी धर्मनाथ बीज सोहळ्याची परंपरा अरुणनाथगिरी महाराज सांभाळत असल्याने संस्थान तीर्थक्षेत्रात समाविष्ट झाले. गावागावांत पारायण सोहळे राजकीय गटतट विसरून लोक साजरे करतात. जगात सामाजिक विषमता तयार झाली असून ही विषमता दूर करण्याचे या सोहळ्यातून संत मंडळी करतात. धार्मिक सोहळा अन् संत समागम हेच एकमेव ठिकाण असे आहे की, याठिकाणी शांती मिळते. समाज परिवर्तनाची खरी ताकद परमार्थात असल्याने विखे यांनी सांगितले.

यावेळी आ. भाऊसाहेब कांबळे, पं. स. सभापती दीपकराव पटारे, बाजार समितीचे सभापती सचिन गुजर, उपनगराध्यक्ष करण ससाणे, जी. के. पाटील, सिद्धार्थ मुरकुटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 
यावेळी कोकणगाव येथील अनिल शिवाजी जोंधळे, बापू शिवाजी जोंधळे या दानशूर भक्तांनी यश अनिल जोंधळे या चिरंजीव बालकाच्या वाढदिवसानिमित्त जॉन डियर ट्रॅक्टर अडबंगनाथ संस्थानला भेट म्हणून दिला. काल्याच्या कीर्तनानंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. यावेळी भाविक उपस्थित होते.

कोण कोणत्या काठावर लागतो हेच समजत नाही!

ना. विखे गोदाकाठच्या देवस्थानचे ठिकाणे सांगत असताना म्हणाले, गोदाकाठप्रमाणे प्रवरा, मुळा काठावरही सर्व धर्मांची देवस्थाने आहेत. परंतु सध्या कोण कोणत्या काठाला लागतो, हेच समजत नाही. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.