Sun, Mar 24, 2019 12:28होमपेज › Ahamadnagar › यंदा कपाशीचा नाद नाय करायचा!

यंदा कपाशीचा नाद नाय करायचा!

Published On: Jun 02 2018 2:00AM | Last Updated: Jun 02 2018 12:26AMढोरजळगाव : बाळासाहेब बर्गे

कपाशीच्या बियाणांची जाहिरात करण्यात आघाडीवर असलेल्या अनेक कंपन्या यंदा मात्र जाहिरातीपासून दूरच राहिल्याचे विरोधाभासी चित्र पहायला मिळत आहे. बोंडअळीच्या धसक्याने कीकाय मात्र ‘ बियाणांची जाहिरात? नको रे बाबा...!’ असाच सावध पवित्रा कपाशी बियाणांच्या कंपन्यांनी घेतला आहे.

एप्रिल-मे महिन्यापासूनच कपाशी बियाणांची जाहिरात खेडोपाडी यापूर्वी ऐकायला मिळायची. विविध कंपन्या आपलेच बियाणे कसे उत्तम प्रकारचे असून तेच शेतकर्‍यांच्या गळी उतरवण्याचा आटोकाट प्रयत्न करायच्या. 

लाउडस्पीकरच्या गाड्या फिरवत खेडोपाडी, रानावनांत फिरवून जागोजागी त्या-त्या कंपन्यांचे होर्डींग्स लावले जायचे.प्रसंगी अगदी शेतकर्‍यांच्या शेतात जावूनही शेतकर्‍यांना प्रात्यक्षिकांद्वारे कपाशी बियाणांची जाहिरात केली जायची. बसस्थानक,जास्त दळणवळण असणार्‍या जागा, मोठाल्या भिंती आदींवर या कपाशी बियाणांच्या जाहिरातींची हुकूमत ही ठरलेलीच असायची. एखाद्या उघड्या वाहनांतून कपाशीचे भले थोरले झाड मिरवत शेतकर्‍यांना भुरळ घालताना गेली कित्येक वर्षे या कंपन्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. अर्थात अनेक शेतकर्‍यांना त्याचा फायदाही झाला हे नाकारून चालणार नाही.
सालाबादप्रमाणे हे सर्व चालू असताना गेल्या वर्षी बोंडअळीने कपाशीच्या पिकावर थैमान घालताना शेतकर्‍यांच्या अर्थकारणावर घाला घालत शेतकर्‍यांचे हातातोंडाशी आलेले पिक या बोंडअळीने खाऊन टाकले. त्यातच गेल्या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावत शेतकर्‍यांच्या फक्त आशाच पल्लवित केल्या नाहीत तर उसाचे विक्रमी पिक त्यामुळे शेतकर्‍यांच्या पदरी पडले.
पाण्याचा साठाही समाधानकारक राहिल्याने उसाच्या क्षेत्रात वाढ झाली. त्याचा परिपाक कपाशीचे क्षेत्र घटण्यात झाला.म्हणजे बोंडअळी आणि उसाचे वाढते क्षेत्र याचा विपरीत परिणाम कपाशीच्या क्षेत्रावर झाल्याचे दिसून आले.त्यामुळेच कि काय यंदा कुठेही कपाशीच्या बियाणांची जाहिरात पहायला किंवा ऐकायला मिळत नसल्याचे विरोधाभासी चित्र पहायला मिळत आहे. एव्हाना अनेक ठिकाणी कपाशीच्या पिकांनी आपले बस्तान बसवायला आतापर्यंत सुरुवातही केलेली असायची. यंदा मात्र कपाशीतील शेतकर्‍यांचा ‘इंटरेस्ट’ कमीच झाल्याचे दिसून येत आहे.‘कपाशीचा नाद नाय करायचा’ असाच पवित्रा शेतकरी आणि कंपन्यांनी घेतल्याचे यावरून दिसून येत आहे.