Tue, Apr 23, 2019 21:35होमपेज › Ahamadnagar › चौंडीप्रकरणी गुन्हे मागे घेण्यासाठी उपोषणाचा इशारा

चौंडीप्रकरणी गुन्हे मागे घेण्यासाठी उपोषणाचा इशारा

Published On: Jun 03 2018 1:11AM | Last Updated: Jun 02 2018 11:43PMकर्जत : प्रतिनिधी

चौंडी येथे 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या धनगर समाज बांधवावर खुनासह इतर खोटे गुन्हे दाखल केले असून ते मागे घ्यावेत अन्यथा धनगर समाज अन्याय निवारण समितीचे राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर सामाजिक संघटनांच्यावतीने चौंडीत अहिल्यादेवी यांच्या मंदिरासमोर 6 जूनपासून उपोषण करण्यात येणार आहे.

तसे निवेदन बहुजन समाज एकता संघटनेचे अध्यक्ष नवनाथ पडळकर, इंदापूर येथील डॉ. शशिकांत तरंगे, रवींद्र पाडुळे, दादा थोरात, दादासाहेब वाळूंजकर यांनी कर्जतच्या प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांना दिले आहे. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अमानुष लाठीचार्ज 

निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यादेवींच्या जन्मोत्सवासाठी राज्याच्या काना-कोपर्‍यातून समाजबांधव येतात. या पावन भूमिची माती कपाळी लावण्यात धन्यता मानणारा हा समाज आहे. या पवित्र भूमीमध्ये सरकारने समाज बांधवावर अन्यान्वीत अत्याचार केला. पोलिस बळाचा प्रचंड वापर करीत बेछूठ लाठीचार्ज केला. यामध्ये शेकडो जखमी झाले. अनेकजण माराच्या भितीने सैरावेरा पळत होते. काही जखमींना पोलिसांनी अटक करून धमकावून त्यांच्याकडून पाय घसरून पडलो व जखम झाली, असे लिहून घेतले आहे. अनेकांवर 307, 353 व अन्य गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये अनेक विद्यार्थी आहेत.गुन्हा दाखल करताना कसलीही शाहनिशा केलेली नाही.  

अशा प्रकारे समाज बांधवांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत. त्यासाठी चौंडी येथे 6 जूनपासून धनगर समाज अन्याय निवारण समिती लोकशाही मार्गाने उपोषण करून आत्मक्लेश आंदोलन करणार आहे.

प्रांताधिकारी नष्टे यांच्याशी बोलताना पडळकर म्हणाले की, खाजगी कार्यक्रमासाठी शासकीय नोटिस देणे चुकीचेआहे. यावेळी पोलिसांचा वापर समाजावर दडपशाही करण्यासाठी केला गेला. डॉ. भिसे पोलिसांच्या ताब्यात होते. गर्दीमधील कोणीतरी दगड मारला. असे असताना त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. शिवाय त्यांना पोलिसांनी प्रचंड मारहाण केली. हा अन्याय आहे. आम्ही सभेला परवानगी मागितली, तर जी जाणीवपूर्वक दिली नाही. नंतर दिली तर पोलिसांनी कार्यकर्त्यांना त्रास दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद फाळके म्हणाले की, दर्शनासाठी आलेल्या समाज बांधवांनी आरक्षणाची मागणी खाजगी कार्यक्रम सुरू असताना केली. तेथे पोलिसांनी दडपशाही केली. निरपराध नागरिकांवर लाठीचार्ज केला. पोलिसांच्या दडपशाहीमुळे सर्व नागरिक, महिला भयभीत झाले होते. 

नष्टे म्हणाल्या की, चौंडीत हजारो भाविक दर्शनासाठी येतात. तेथील शांतता कोणी बिघडवत असेल तर त्याला नोटिस देण्याचा आमचा अधिकार आहे. सभेला परावनगीची बाब पोलिसांशी निगडीत आहे. आपल्या भावना प्रशासनाला कळविण्यात येतील. 

यावेळी काँग्रेसचे नेते अंबादास पिसाळ, बाळासाहेब साळुंके, दादासाहेब सोनमाळी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, सरपंच श्याम कानगुडे, युवक अध्यक्ष नितीन धांडे, स्वप्नील तनपुरे, गोरे, बजंगे आदी उपस्थित होते.