Mon, May 20, 2019 18:49होमपेज › Ahamadnagar › अटकेच्या भीतीने चालक सैरभैर

अटकेच्या भीतीने चालक सैरभैर

Published On: Feb 19 2018 1:58AM | Last Updated: Feb 19 2018 12:02AMनगर : प्रतिनिधी

अनियमितता आढळून आलेल्या 426 चारा छावणीसंस्थांपैकी आतापर्यंत 238 छावणीसंस्थाचालकांविरोधात गुन्हे दाखल झाल्याचा अहवाल प्रशासनाने न्यायालयाला सादर केला आहे. उर्वरित संस्थांचालकांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याबाबतची आगामी सुनावणी आता 23 फेब्रुवारीला होणार आहे. पोलिसाचा ससेमिरा मागे लागून, आता अटक अटळ आहे, या भीतीने सहकारी संस्थांचे तत्कालीन साडेतीन हजारांवर संचालक सैरभैर झाले आहेत. 

सन 2012-13 व 2013-14 या दोन वर्षात जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती होती. या दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांचे पशुधन वाचविण्यासाठी शासनाने चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार छावण्या चालविण्यासाठी सहकारी आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आणि गावागावांत छावण्या उभारल्या गेल्या. अटी व शर्तीप्रमाणे छावण्या चालविल्या जात आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तहसीलदार व उपविभागीय अधिकार्‍यांची भरारी पथके नियुक्‍त केली होती. तपासणीत जवळपास सर्वच छावण्यांत अनियमितता आढळल्याने प्रशासनाने छावणीसंस्थांवर दंडात्मक कारवाई केली होती.

सोलापूर जिल्ह्यातील गोरख आनंदा घाडगे यांनी सोलापूर, बीड, नगर व इतर जिल्ह्यातील चारा छावणीत अनियमितता होवून, कोट्यावधींचा घोटाळा झाला अशी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने अनियमितता आढळून आलेल्या छावणीसंस्थांच्या चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश शासनाला दिले. त्यानुसार जिल्हाभरातील छावणीसंस्था  चालकांविरोधात गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील 72 संस्थाचालक औरंगाबाद खंडपीठात गेले. सदर संस्थाचालकांचे म्हणणे एकूण घेण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले. त्यानुसार 72 छावणीसंस्था चालकांना प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत. उर्वरित छावणीसंस्थापैकी 238 संस्थाचालकांविरोधत गुन्हे दाखल झाले आहेत. 16 फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. उर्वरित छावणीसंस्थाचालकांविरोधत तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. याबाबतची सुनावणी आता 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे.