Mon, Mar 25, 2019 09:49होमपेज › Ahamadnagar › आंदोलकांच्या केसेस मोफत लढणार

आंदोलकांच्या केसेस मोफत लढणार

Published On: Jul 25 2018 1:36AM | Last Updated: Jul 24 2018 11:04PMनगर : प्रतिनिधी

मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनात मराठा बांधवांवर गुन्हे दाखल झाल्यास, त्यांचे खटले (केसेस) मोफत लढण्याचा निर्णय शहर वकील संघटनेने केला आहे. तसा ठराव काल (दि.24) न्यायालयात झालेल्या बैठकीत करण्यात आला. 

वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश ठोकळ यांनी हा ठराव मंडला. त्यास उपस्थित सर्व वकिलांनी एकमताने मंजुरी दिली. जेष्ठ विधिज्ञ सुरेश लगड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी अ‍ॅड. ठोकळ म्हणाले की, मराठा समाजातील अनेक पुढारी, आमदार, मंत्री सातत्याने सत्तेत असूनही, आजपर्यंत समाजास आरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे आंदोलनास वकील संघटनेने सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला आहे. आता हे आंदोलन अधिक तीव्र होत असल्याने नगरमधील मराठा बांधवांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मराठा बांधवांच्या सर्व केसेसचे वकील पत्र वकील संघटनेचे सदस्य घेणार असून, त्यांच्या केसेस मोफत लढण्याचा निर्णय घेतण्यात आला आहे.  या बैठकीत कायगाव टोका येथील जलसमाधी आंदोलनात बळी पडलेल्या काकासाहेब शिंदे या युवकास श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष अ‍ॅड.कृष्णा झावरे, सचिव अ‍ॅड.प्रशांत मोरे, महिला सचिव अ‍ॅड. अनुराधा येवले, सहसचिव अ‍ॅड.चंदन बारटक्के आदी उपस्थित होते.