Sat, Jun 06, 2020 09:16



होमपेज › Ahamadnagar › दूधधंद्याची वाताहत कर्डिलेंना का दिसेना?

दूधधंद्याची वाताहत कर्डिलेंना का दिसेना?

Published On: Jul 10 2018 1:01AM | Last Updated: Jul 09 2018 11:27PM



राहुरी : प्रतिनिधी

राहुरी मतदारसंघाला दुर्दैवाने लाभलेले आमदार पूर्वी सायकलवर दूध विक्री करीत होते. त्यांच्याकडे आज अलिशान चारचाकी वाहने आली आहेत. त्यांनी दूधधंद्यातून प्रगती साधल्याचा कांगावा केला. मात्र, त्याच दूधधंद्याची आज झालेली वाताहत आपल्या आमदाराला दिसत नाही, ही शोकांतिका आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांविषयी विधानसभेत चकार शब्द न काढणार्‍या या आमदारांना शेतकर्‍यांची कोणतीही आस्था नाही. त्यामुळे हे आमदार व त्यांचे सरकार पाडण्यासाठी राहुरीकरांनी वज्रमूठ बांधावी, असे आवाहन नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केले.

राहुरी येथे राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, जि. प. सदस्य शिवाजी गाडे यांच्या मार्गदर्शनात भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता. अध्यक्षस्थानी युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते हे होते. यावेळी नगराध्यक्ष तनपुरे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर चौफेर हल्ला चढविताना कर्जमाफी, बोंडअळी, शेती अनुदान, पीकविमा आदी प्रश्‍नांबाबत सरकारकडून शेतकर्‍यांची थट्टा करण्यात आल्याचा आरोप केला. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, नोटाबंदीनंतर कॅशलेस धोरण, टोल माफी व खड्डेमुक्‍त रस्ते आदी घोषणा हवेतच विरल्या. तरुणांना रोजगार नाही, महिलांची असुरक्षितता, वाढलेली गुन्हेगारी, वाढलेले वीज समस्या या सर्वच प्रश्‍न रेंगाळले आहेत. आघाडी सरकारच्या काळात दुधाला 27 रुपये दर होता. आज युती सरकारकडून दुधाला 17 रुपये दर दिला जात असल्याने संताप व्यक्त केला. 

याप्रसंगी जि.प.सदस्य शिवाजी गाडे यांनी शेतकर्‍यांचा जाणता राजा असणार्‍या शरद पवार यांनी देशाला अन्नधान्याबाबत अग्रक्रमांकावर नेले. दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी पवार यांनी देशातील शेतकर्‍यांना बळ देत जगात भारताचे नावलौकिक केले. मात्र, भाजप सरकारने सत्ता ताब्यात घेतल्यापासून प्रत्येक घटकावर अन्याय केला आहे. देशाला अंतर्गत पोखरून वाटोळे करणार्‍या भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी शरद पवार यांचे हात बळकट करण्याचे आवाहन गाडे यांनी केले. संग्राम कोते यांनी भाजप सरकार हे गेंड्याची कातडे पांघरून शेतकर्‍यांना पायदळी तुडवित आहेत. राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा द्यावा, 

प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी पक्षासोबत राहुरी मतदारसंघात सर्वांनी एकवटण्याचे आवाहन केले. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, प्रकाश देठे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. अप्पासाहेब जाधव, नवाज देशमुख, शिवाजी सागर आदींनी मनोगत व्यक्‍त केले. याप्रसंगी पाथर्डी पं.स.सदस्य राहुल गवळी, सुरेशराव वाबळे, बाबासाहेब भिटे, पवन दिघे, मच्छिंद्र सोनवणे, बाबासाहेब सोनवणे, खतीबभाई देशमुख, गोरक्षनाथ गाडे, विजय बर्डे,  विजय माळवदे उपस्थित होते.

राहुरीची राम-लक्ष्मणाची जोडी ! 

राष्ट्रवादी काँगे्रसच्या माध्यमातून तनपुरे व गाडे गटाने एकत्र येत भव्य मोर्चा काढत एकी दाखवून दिली. पहिल्यांदा आंदोलनाच्या माध्यमातून एकत्र आलेले प्राजक्त तनपुरे व शिवाजी गाडे यांनी एकीची मोट बांधून राहुरी मतदार संघाचा हरपलेला विकास रुळावर आणण्याचे आवाहन अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून केले. याशिवाय शिवाजी सागर यांनी गाडे व तनपुरे म्हणजे राम-लक्ष्मणाची जोडी असल्याचे सांगून हे एकत्र आल्याचा आनंद भाषणातून व्यक्त केला.