Tue, May 21, 2019 00:07होमपेज › Ahamadnagar › शिर्डी विमानतळाला सीआयएफएसची सुरक्षा 

शिर्डी विमानतळाला सीआयएफएसची सुरक्षा 

Published On: Jun 07 2018 2:04AM | Last Updated: Jun 06 2018 11:23PMशिर्डी : प्रतिनिधी

देश-विदेशातील साईभक्तांना हवाई मार्गाने प्रवास करता यावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरक्षा व्यवस्था पोलिसांकडून काढून घेण्यात आली आहे. ही सुरक्षा व्यवस्था आता केंद्रीय उद्योग सुरक्षा बलाकडे (सीआयएफएस) देण्यात आली असून, उद्या (दि.8) पासून ही सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित होत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात विलासराव देशमुख व अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना कोपरगाव तालुक्यातील काकडी विमानतळाच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार व महाराष्ट्र विमान प्राधिकरणाने पुढाकार घेऊन हे विमानतळ 1 ऑक्टोबर रोजी सुरू केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर या विमानतळावरून हैदराबाद व मुंबई विमान सेवा सुरू करण्यात आली होती. त्यावेळी महाराष्ट्र पोलिस दलाचे 30 कर्मचारी, तर महाराष्ट्र सुरक्षा बलाचे 60 कर्मचारी विमान तळाच्या सुरक्षेसाठी देण्यात आले होते. 

दरम्यानच्या काळात विमान घसरल्याच्या घटना या विमानतळावर घडली होती. त्यामुळे हे विमानतळ चर्चेत आले होते. त्याचबरोबर येथील सुरक्षाही कमकुवत असल्याने खासगी विमाने येथे उतरत नव्हते. या विमानतळाच्या लोकार्पणानंतर सात महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर केंद्रीय उद्योग सुरक्षा बलाकडे सुरक्षा देण्याचा निर्णय महाराष्ट्र विमान प्राधिकरणाने घेतला आहे. या सुरक्षा बलाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम काकडी येथील विमानतळावर आज (दि. 7) होणार असून, उद्या (दि. 8) पासून ही सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होत आहे.