Sat, Feb 23, 2019 23:04होमपेज › Ahamadnagar › सीसीटीव्ही, पण डीव्हीआर नाही!

सीसीटीव्ही, पण डीव्हीआर नाही!

Published On: Apr 15 2018 1:35AM | Last Updated: Apr 15 2018 12:36AMनगर : प्रतिनिधी

‘एसआयटी’ने भानुदास कोतकर यांचे घर व आयुर्वेद महाविद्यालयात जाऊन तेथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांतून काही पुरावा मिळतो का, याची पाहणी केली. परंतु, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे दिसले. मात्र, ‘डीव्हीआर’च आढळून आला नाही, असे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजले.

केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास करणार्‍या विशेष तपास पथकाने गुन्ह्यांच्या अनुषंगाने काही माहिती किंवा पुरावे मिळतात का, यासाठी भानुदास कोतकर व आ. जगताप पिता-पुत्रांचे संपर्क कार्यालय असलेल्या आयुर्वेद कॉलेजला भेट दिली. तेथील सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना पाहावयाचे होते. पोलिसांना कोतकर यांचे घर व आयुर्वेद कॉलेजला गेल्यानंतर दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे दिसले. मात्र, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे रेकॉर्डिंग जतन करणारा ‘डीव्हीआर’ तेथे आढळून आला नाही. त्यामुळे पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले. 

सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा ‘डीव्हीआर’च नसल्याने तो गायब करण्यात आला की अनेक दिवसांपासून कॅमेरे बंद होते, याचा उलगडा होऊ शकला नाही. तेथील कॅमेरे पोलिसांच्या हाती लागल्यास पोलिसांना केडगाव दुहेरी हत्याकांड व पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणातील महत्त्वाची माहिती हाती लागली असती. मात्र, फूटेज पाहण्यास न मिळाल्याने पोलिसांची निराशा झाली आहे.
पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. केडगाव दुहेरी हत्याकांडासह केडगाव येथे पोलिसांवरील दगडफेक, पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणाचाही या पथकाकडून तपास सुरू आहे. ‘एसआयटी’च्या अंतर्गत अनेक पथके तयार केली असून, ते आरोपींचा शोध घेत आहेत. 

Tags : CCTV,  no DVR ,nagar news